आमदार संदीप नाईक यांना पालिका आयुक्तांचे आश्वासन
नवी मुंबई : आमदार संदीप नाईक यांच्या प्रयत्नांतून ऐरोली येथे साकारात असलेल्या नाटयगृहाच्या कामाला लवकरच गती मिळणार असून या आणि शहरातील इतर प्रलंबित विषयांवर आमदार नाईक यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त डॉ रामास्वामी एन यांची भेट घेतली. यावेळी नाटयगृहासाठी काढण्यात आलेल्या पुर्ननिविदेतील उणिवा दूर करुन नाटयगृहाचे काम लवकरात-लवकर कसे सुरु होईल, हे पाहू, अशी ग्वाही आयुक्त रामास्वामी एन यांनी आमदार नाईक यांना दिली. महापौर जयवंत सुतार आणि पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रतोद डॉ जयाजी नाथ हे आयुक्तांच्या भेटीप्रसंगी उपस्थित होते.
ऐरोली विधानसभा क्षेत्रातील नाटयप्र्रेमींना नाटके बघायची असतील तर त्यांना एकतर वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृह किंवा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करुन जावे लागत होते. नाटयरसिकांची ही अडचण लक्षात घेवून आमदार नाईक यांनी ऐरोली येथे सिडकोकडून नाटयगृहासाठी भुखंड मिळवून दिला. त्यावर पलिका नाटयगृह बांधते आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकात नाटयगृह बांधण्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. याशिवाय आमदार नाईक यांनी नाटयगृहातील आसनव्यवस्थेसाठी ३० लाख रुपयांचा आमदार निधी देखील दिला आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या नाटयगृहाचे काम सध्या थांबले आहे. आमदार नाईक यांनी या संदर्भात पालिकेचे महापौर आणि आयुक्तांना हे काम सुरु करण्यासाठी पत्र दिले होते. नाटयगृहाच्या निर्माणाधिन जागेवरही पाहणी केली होती. या नंतर पालिकेने नाटयगृह बांधण्यासाठी नविन निविदा काढली. परंतु ही निविदा भरण्यासाठी कुणी ठेकेदार पुढे येत नाही. या निविदेतील काही तांत्रिक उणिवा असतील तर त्या दूर कराव्यात, अशी सुचना आमदार नाईक यांनी पालिका आयुक्तांना करुन दर्जेदार नाटयगृह नवी मुंबईकरांच्या सेवेत रुजू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पावसाळयात शहरातील ज्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे ज्या रस्त्यांवर खडडे पडले आहेत त्या रस्त्यांची पावसाची उघडीप मिळताच गणेशोत्सवापूर्वी डागडुजी करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.
धोकादायक इमारतींच्या पुर्नबांधणीसाठी संक्रमण शिबीरांची नितांत आवश्यकता असून या कामी सिडकोची मदत घेवून संक्रमण शिबीरांचा विषय मार्गी लावावा, अशी सुचना देखील आमदार नाईक यांनी केली.
आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर एमएमआरडीएच्या माध्यमातून दोन उडडाणपूल आणि एक भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. आता या मार्गावरुन एमआयडीसी भागात कनेक्टिीव्हिटी देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून उडडाणपूल उभारावेत, अशी मागणी देखील आमदार नाईक यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ रामास्वामी एन यांनी त्यांना दिले आहे.