अबू सालेमला पॅरोल देण्यास न्यायालयाचा नकार
मुंबई : कुख्यात डॉन अबू सालेमचा पॅरोल अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ११९३ साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरलेल्या अबू सालेमने ४५ दिवसांची सुट्टी मागितली होती. विशेष म्हणजे हा पॅरोल त्याने मुंब्राची रहिवासी असणाऱ्या कौसर बहार हिच्याशी लग्न करण्यासाठी मागितला होता. अबू सालेमच्या अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.
अबू सालेम सध्या तळोजा कारागृहात असून याआधीही त्याचे पॅरोलसाठी अर्ज फेटाळण्यात आले होते. अबू सालेमने अर्जात न्यायालयाच्या निर्णयांनाही आव्हान दिलं होतं. आज उच्च न्यायालयात अबू सालेमच्या अर्जावर सुनावणी पार पडली. मुख्य न्यायाधीश विजय कापसे तहिलरमानी आणि महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
दरम्यान अबू सालेमच्या वकिल फरहाना शेख यांनी कोणतेही डोके न वापरता आतापर्यंत अर्ज फेटाळण्यात आल्याचे म्हटले होते. एप्रिलमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यावेळी अबू सालेमने ५ मे रोजी लग्न करत असल्याचा दावा केला होता. मात्र यावेळी उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या अर्जात त्याने कोणतीही तारीख दिलेली नव्हती.
याआधी अबू सालेमने कौसरशी २०१४ मध्ये रेल्वे प्रवासादरम्यान फोनवरच लग्न केल्याचा दावा केला होता. त्याला त्यावेळी सुनावणीसाठी लखनऊला नेले जात होतं. कौसरनेदेखील स्थानिक न्यायालयात अर्ज करत अबू सालेमशी लग्न करण्याची परवानगी न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. अबू सालेमशी निकाह झाल्याच्या वृत्तामुळे आपली आधीच बदनामी झाल्याचे तिने सांगितले होते.