दीपक देशमुख
नवी मुंबई: खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी खारघर पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सदरचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. मात्र, त्यानंतर देखील अनेक पर्यटक पोलिसांच्या मनाई
आदेशाला न जुमानता पांडवकडा धबधब्यावर जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता अशा पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ४ ऑगस्ट
रोजी अशा आठ पर्यंटकांवर भा.दं.वि. कलम १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.
खारघर मधील पांडवकडा धबधब्यावर पावसाळी सहलीची मजा लुटण्यासाठी मुंबईसह विविध ठिकाणावरुन हजारो पर्यटक प्रत्येक वर्षी येत असतात. मात्र, पर्यटकांसाठी धबधबा सुरक्षित नसल्याने याठिकाणी प्रत्येकवर्षी दुर्घटना घडतात. सन २०१४ ते २०१७ या कालावधीत सुमारे ८ ते १० पर्यटकांचा येथील पाण्यात बुडून तसेच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे मृत्यू झालेला आहे. तसेच अनेक पर्यटक जखमी झालेले आहेत. त्यामुळे पांडवकडा धबधबा परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये अथवा जीवितहानी होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी यावर्षी पांडवकडा परिसर कलम १४४ अन्वये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यासाठी पोलिसांनी खारघर तसेच पांडवकडा परिसरात बॅनर्स, पोस्टर्सच्या माध्यमातून पर्यटकांसाठी विशेष सूचना देऊन सदर परिसरात प्रवेश करणार्या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे. त्याशिवाय पांडवकडा आणि आजुबाजुच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर देखील काही पर्यटक पोलिसांच्या सुचनांचे पालन न करता, पोलिसांची नजर चुकवून पांडवकडा परिसरामध्ये मौजमजा करण्यासाठी जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. ४ ऑगस्ट रोजी अशाच पद्धतीने आठ पर्यटक पांडवकडा परिसरामध्ये गेल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी या आठ पर्यटकांवर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम १८८ प्रमाणे २ गुन्हे दाखल केले आहेत. यात नवी मुंबईतील ५ तर मुंबईतील ३ पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली. दरम्यान, पांडवकडा धबधबा परिसर धोकादायक असल्याने तेथे कुणीही जाऊ नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे.