सांगली : देशात मोदीविरोधी वातावरण असल्याच्या वल्गना करणाऱ्या विरोधकांना सांगली महापालिकेच्या निकालाने धडा दिला असून आता काँग्रेसने २०१९ मध्ये निवडणूक लढविण्यासाठी पसा आणि श्रम वाया घालविण्यापेक्षा २०२४ ची तयारी करावी, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महापालिकेत सत्तांतर करीत विजयी झालेल्या भाजपाचा विजयी मेळावा बुधवारी रात्री एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी सर्व भाजपाचे नवनिर्वाचित सदस्य आणि नेते यांनी गणेश दर्शन घेतले. या वेळी आ. सुरेश हाळवणकर, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदींसह पक्षाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकत्रे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की सांगली महापालिकेत भाजपने घडवलेले परिवर्तन मोठे आहे. दिल्लीनेही त्याची दखल घेतली. निवडणुकीपूर्वी भाजपचे काही खरे नाही, जनता कंटाळली, असे चित्र विरोधकांनी निर्माण केले होते. परंतु त्याला मतदारांनी तडा दिला. मतदानाच्या पूर्वसंध्येला एका मुलाखतीत मी छातीठोकपणे भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य केले होते. नागरिकांनी आमच्या कामांवर विश्वास ठेवून मतदान केले. इथला उद्योग, व्यापार वाढवून विकास केला जाईल. समृद्ध सांगलीचे चित्र दिसेल.
ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील पुन्हा निवडून येतील. विधानसभेच्या आठपैकी आठ जागांवर विजय मिळवू. नगरपालिका निवडणुकीत तासगाव, कडेगाव, इस्लामपूरमध्ये विजय मिळाला. वसंतदादांची सांगलीही जिंकली. पृथ्वीराज चव्हाण यांचे कराडही जिंकले. जिल्ह्यत थोडीशी काँग्रेस शिल्लक आहे. विधानसभेला जिल्हा काँग्रेसमुक्त होईल. २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणी उभे राहणार नाही. हाच विजय आहे.
या वेळी आ. खाडे म्हणाले, की आता बाजार समिती व जिल्हा बँक बाकी आहे. भाजपचा झेंडा तिथेही फडकवू. काँग्रेस उमेदवारांना गुलाल लागणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आ. हाळवणकर म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीला निकाल जिव्हारी लागला. जयंत पाटील तुम्ही जिंकला की तो विजय आणि आम्ही जिंकलो की गडबड हे बंद करा. त्यांची डोकी बिघडलीत. बदनामीसाठी विविध मार्गाचा अवलंब ते करत आहेत.
या वेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेत काम करण्याची जबाबदारी शेखर इनामदार यांच्यावर सोपविण्यात येत असल्याचे या वेळी मंत्री पाटील यांनी घोषित केले.