नवी मुंबई : किमान वेतन अधिनियमानुसार महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन अदा केले जात असून सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार अनुज्ञेय असलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतनातील 13 महिन्यांचा फरक अदा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी जारी केले असून त्यामुळे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या 24 फेब्रुवारी 2015 रोजीच्या अधिसुचनेनुसार किमान वेतन देण्याबाबत 15 फेब्रुवारी 2017 रोजी महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली असून त्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना त्यांच्या वर्गवारीनुसार किमान वेतन अदा केले जात आहे.
त्याचप्रमाणे दि. 19 मे 2017 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार कंत्राटी कामगारांना किमान वेतनातील फरक अदा करण्याचे निवेदनात नमूद असल्याने महानगरपालिकेतील सर्व विभागांतील किमान वेतनातील फरक अनुज्ञेय असलेल्या कंत्राटी कामगारांना फरकातील वेतन अदा करणेबाबत 30 जुलै 2018 रोजीच्या सर्वसाधारण सभेने मंजूरी दिलेली आहे.
त्यानुसार महानगरपालिकेच्या ज्या विभागातील कंत्राटी कामगारांना जून 2017 पासून किमान वेतन अदा कऱण्यात येत आहे त्यांना जून 2017 अगोदरच्या मागील 13 महिन्याचा किमान वेतनातील फरक वर्गवारीनुसार व त्या कालावधीतील विशेष भत्त्यानुसार अदा करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. यामुळे कंत्राटी कामगारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.