नवी मुंबई: नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची घरे, बांधकामे शासनस्तरावर नियमित करण्यासंदर्भात हालचाली सुरु असतानाच आता विरोधकांनी दुसर्याच प्रकारची मागणी करुन यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे. विशेष म्हणजे आपण प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मार्गी लागणार्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी विरोधकांनी चालविलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी म्हटले आहे.
गावठाणाच्या सर्व्हेच्या मागणीच्या अनुषंगाने मुळात विस्तारीत गांवठाण, मूळ गांवठाण, गरजेपोटीची घरे असे ग्रामस्थांच्या घरांचे नियमित करण्यासाठीचा विषय उगाच फाटे फोडणारे आहेत. आज १९७२ पासून सदरचा विषय प्रलंबित होता. त्यावर बैठका घेणार्या बर्याच जणांच्या चाळी या काळात उभ्या राहिल्या. संस्थांचे भूखंड झाले; पण ग्रामस्थांचा प्रश्न मात्र अधांतरीच राहिला.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सौ. मंदाताई म्हात्रे यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सर्वात प्रथम ग्रामस्थांची जी कामे करण्यासाठी प्रलंबित होती, ती मार्गी लावण्यास खर्या अर्थाने सुरुवात झाली. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करणे हाच अत्यंत महत्वाचा प्रश्न होता. यासंदर्भात प्रत्येक बैठकीत मूळ गांवठाण आणि विस्तारीत गांवठाण, गरजेपोटीची घरे असेच विषय त्रासदायक ठरत होते. याचे प्रमुख कारण म्हणजे संपादित जमीन आणि गावठाणातील संपादित न केलेली जमीन अशामुळे निर्णय पाहिजे तसा होत नव्हता. त्यावर या घोळात न पडता आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सर्वप्रथम ग्रामस्थांची घरे नियमित करण्याबाबत एक ठोस भूमिका घेतली. जर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व अनधिकृत घरे जर नियमित होत असतील तर ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली घरे तर त्यांच्याच जागेवर बांधलेली असून ती घरे नियमित झालीच पाहिजेत, अशी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आग्रही भूमिका घेऊन पाठपुरावा केला. अखेर या सर्व पाठपुराव्याला यश येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नवी मुंबईतील कार्यक्रमात तसे जाहिर आश्वासन दिले होते. त्याअनुषंगाने पुढील निर्णायक बैठक गत ६ जून २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांच्या कार्यलयात झाली. सदर बैठकीत नवी मुंबई महापालिका आयुक्त, ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक, नगरविकास अधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी आदि उपस्थित होते. परंतु, आता परत राजकीय आशा आकांक्षा मनात बाळगून अथवा स्वतःच्या ४००० मीटर पर्यंतच्या चाळी नियमित होण्यासाठी पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालविला असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. शिवाय तसे जर झालेच तर चुकीचे निर्णय प्रकल्पग्रस्तांच्या होऊ घातलेल्या घरे नियमितीकरणामध्ये खोडा घालू शकतो, अशी भितीही आमदार सौ. म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.