नवी मुंबई : मोरबे धरणामुळे जलसमृध्द शहर अशी ओळख असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा येथे स्वत:च्या मालकीचे जलशुध्दीकरण केंद्र असून त्या जलशुध्दीकरण केंद्रास आय.एस.ओ. 9001-2015 हे गुणवत्ता मानांकन प्राप्त झाले आहे. जलशुध्दीकरण कार्यपध्दतीतील सर्व बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या कार्यप्रणालीचा हा गौरव असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी याबद्दल शहर अभियंता श्री. मोहन डगांवकर आणि मोरबे धरण प्रकल्प व जलशुध्दीकरण केंद्राशी संबंधित अभियंतावर्ग व अधिकारी – कर्मचारीवृंदाचे अभिनंदन केले आहे.
450 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राची नवी मुंबई महानगरपालिकेने उभारणी करून ते 2012 मध्ये कार्यान्वित केले आहे. या जलशुध्दीकरण केंद्रातूनच संपूर्ण नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. जलशुध्दीकरण केंद्रातील पाण्याची गुणवत्ता राखणे, जलशुध्दीकरण केंद्राची मांडणी व कार्यप्रणाली यादृष्टीने आय.एस.ओ. 9001-2015 या प्रमाणपत्रानुसार आय.एस.ओ. च्या पथकाकडून त्यांनी निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार जलशुध्दीकरण केंद्रांची काटेकोर तपासणी करण्यात आली. यामध्ये जलशुध्दीकरण केंद्राच्या गुणवत्तेचे निरिक्षण व परिक्षणाअंती आय.एस.ओ. 9001-2015 हे गुणवत्ता विषयक मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस 2021 पर्यंत प्राप्त झाले असून यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुणवत्ता शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.