स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबईः नवी मुंबई महापालिका मध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना ‘समान काम समान वेतन’ मिळण्याच्या मागणीसह कंत्राटी कामगरांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील, अशी ग्वाही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘नवी मुंबई म्युनिसिपल मजदुर युनियन’च्या शिष्ठमंडळाला दिली.
महापालिकेच्या विविध विभागात काम करणार्या कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रन मार्गी लागण्यासाठी ‘नवी मुंबई म्युनिसिपल मजदुर युनियन’च्या शिष्ठमंडळाने ११ ऑगस्ट रोजी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी ‘युनियन’च्या पदाधिकार्यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची यादी वाचल्यानंतर महापालिका मधील सर्व कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची पुर्तता होण्यासाठी विधानसभा सभागृहात आपण यापुढे सातत्याने आवाज उठवू, असे आश्वासन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी ‘युनियन’च्या पदाधिकार्यांना दिले.
नवी मुंबई महापालिका स्थापन होण्यापुर्वी पासून कार्यरत असलेल्या महापालिका मधील कंत्राटी कामगाराना अद्याप कायम करण्यात आले नसून, ‘समान काम समान वेतन’ धोरण देखील महापालिका प्रशासनाने रद्द केल्याने आता केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्यांना लागू झालेल्या सातवा वेतन आयोगापासून महापालिकेतील कंत्राटी कामगार वंचित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी ‘नवी मुंबई म्युनिसिपल मजदुर युनियन’चे संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे यांनी आ. सौ. मंदाताई म्हात्रे याना दिली.
महापालिकेच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत, घंटागाडी विभागामधील कंत्राटी कामगारांना कुशल श्रेणी लागू करण्यात यावी, कंत्राटी कामगारांना महापालिकामध्ये कायम करण्यात यावे, महापालिका कंत्राटी कामगारांसाठी ‘समान काम समान वेतन’ धोरण पुन्हा लागू करण्यात यावे, किमान वेतनाचा २७ महिन्यांचा फरक त्वरीत देण्यात यावा, कंत्राटी कामगारांसाठी घरकुल योजना राबवण्यात यावी, कंत्राटी कामगारांसाठी महापालिकातर्फे सामुहिक विमा योजना लागू करण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांना ‘नवी मुंबई म्युनिसिपल ाजदुर युनियन’च्या शिष्ठमंडळाला दिले.
‘नवी मुंबई म्युनिसिपल मजदुर युनियन’च्या शिष्ठमंडळात ‘युनियन’चे संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे, उपाध्यक्ष नरेंद्र वैराळ, सुनिल शिर्के, राजेश सरोदे, जगदिश म्हात्रे, गजानन अंबारे, यशवंत काळे आणि कंत्रांटी कामगार यांचा समावेश होता.
*************
महापालिका मधील सर्व कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्काच्या मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी विधानसभा सभागृहात आपण आवाज उठवणार असून, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची ‘युनियन’च्या पदाधिकार्यांसह भेट घेऊन कंत्राटी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार आहे.
– आ. सौ. मंदाताई म्हात्रे