प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : गृहनिर्माण आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
आज मंत्रालयात आयोजित मुंबई उत्तर मध्य लोकसभा क्षेत्रातील विविध नागरी प्रश्नांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी खासदार पुनम महाजन उपस्थित होत्या. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई विमानतळाच्या विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या विमानपतन प्राधिकरणाच्या जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसन, मिठी नदी रुदींकरण प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन, डिफेन्स लँडवरील घरांचे पुनर्वसन, माहुल येथील सदनिकांचा पुनर्विकास तसेच बांद्राच्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी संबधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी.
सदर आढावा बैठकीत संघर्ष नगर चांदीवली येथील घरांच्या वाढीव चटई क्षेत्राचा प्रश्न, गृहनिर्माण सोसायट्यांना प्रदान केलेल्या कलेक्टर लँडवरील कलेक्टर लँड पॉलिसी नुसार प्रिमिअममध्ये बदल करणे, कुर्ला येथील बंद असलेली दुग्धशाळा चालू करणे, कुर्ला येथील रिकामी जमीन नाट्यगृह, सरकारी रुग्णालये व स्मशानभूमीसाठी उपलब्ध करुन देणे, केदारनाथ विद्या प्रसारिणी शैक्षणिक संस्थेची म्हाडा कार्यालयात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणे तसेच कुर्ला रेल्वे स्थानक ते बीकेसीपर्यंत स्कायवॉक करण्याबाबत चर्चा झाली. हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला मुख्य सचिव डी.के.जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर,गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, पदुमचे सचिव किरण कुरुंदकर आदी उपस्थित होते.