अमोल इंगळे
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळ नोडमधील सेक्टर १२ मधील प्रभाग ९५़ मधील पंडीत रामा भगत उद्यानात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या माध्यमातून एलईडी लाईट बसवून तेथील समस्यांचे निवारण करण्यात आले. प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या एलईडी लाईटच्या लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
या उद्यानात सकाळी व सांयकाळी नेरुळ सेक्टर १०,१२, नेरुळ गाव, सारसोळे परिसर रहीवाशी येत असतात. लहान मुले उद्यानात खेळण्यासाठी येत असतात. सकाळपासून रात्री उशिरापर्यत बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यत सर्वांचीच या ठिकाणी वर्दळ असते. पूर्वी या उद्यानातील खेळणी मोडकळीस आल्याने मुलांची गैरसोय होत होती. नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून नवीन खेळणी बसविली. उद्यानात अपुर्या प्रकाशामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी उद्यानात एलईडी लाईटची व्यवस्था करून उद्यान प्रकाशमय केले आहे. एलईडी लाईट बसविताना हायमस्टही नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी उद्यानात बसविला आहे. हा लोकार्पण सोहळा नवी मुंबईचे माजी उपमहापौर गोपीनाथ ठाकूर, नेरुळ गावचे माजी सरपंच के.एन.म्हात्रे तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.