मुंबईमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना मुंबई पोलिसांनी आज सकाळी अटक केली. मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
कुर्ल्यामध्ये सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाईमुळे तुर्डे यांनी सरकारी कार्मचाऱ्यांना मारहाण केली. तुर्डे यांनी मारहाण केलेल्यांमध्ये महानगरपालिकेचा कंत्राटदार आणि अभियंत्याच्या समावेश आहे. काल रात्री हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी आज सकाळी तुर्डे यांना अटक केली आहे.
मुंबई मनपा निवडणुकीमध्ये मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. केवळ कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६६ मधून निवडणून आलेले संजय तुर्डे हेच आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले. नगरसेवक पदाची निवडणूक जिंकल्यानंतरही विरोधक उमेदावाने तुर्डेंवर हल्ला केला होता. विजयानंतर तुर्डे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर घराबाहेर जल्लोष करत असताना त्यांच्यासहीत त्यांच्या कार्त्यकर्त्यांवर हल्ला झाला होता. ज्यामध्ये तुर्डे यांच्यासह पाच कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते. भाजपचे पराभूत उमेदावर सुधीर खातू यांनी हा हल्ला केल्याच्या आरोप त्यावेळी तुर्डे यांनी केला होता.