नवी मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात जीवनमान निर्देशांकात नवी मुंबई हे देशात राहण्यासाठी दुसर्या क्रमांकाचे सर्वात उत्कृष्ट शहर ठरले आहे. केंद्रीय स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशात नवी मुंबईने अलिकडेच प्रथम क्रमांक पटकाविलेला असताना लगेचच प्राप्त झालेला हा दुसरा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान आहे. हा पुरस्कार अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त करुन महापौर जयवंत सुतार यांनी लोकनेते गणेश नाईक यांच्या दूरदर्शी आणि नियोजनबध्द विकासाच्या व्हिजनमुळे हे मानाचे पुरस्कार या शहराला प्राप्त होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि विकास मंत्रालयाच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याबददल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी नवी मुंबई शहराच्यावतीने महापौर सुतार यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत पालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रतोद डॉ जयाजी नाथ, नगरसेवक अशोक गुरखे, नगरसेवक सुनिल पाटील, माजी नगरसेविका राजश्री कातकरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना महापौर सुतार म्हणाले की, नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९९५पासून लोकनेेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने शहराच्या लौकीकास साजेल अशी विकासाची कामे झाली आहेत. लोकनेते नाईक यांच्या लोकहिताय विकासाभिमुख धोरणांची पुर्तता पालिकेच्या माध्यमातून करीत असताना विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त होत आहेत, याचा निश्चितच आनंद आहे. हे पुरस्कार म्हणजे नवी मुंबईकरांचा सन्मान आहे.
डॉ. नाईक यांनी देखील नवी मुंबईसाठी हा पुरस्कार अभिमानास्पद असल्याचे नमूद करुन लोकनेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई शहराने आजवर विकासाचे अनेक मैलाचे दगड ओलांडल्याची प्रतिक्रीया दिली आहे. या पुरस्कारासाठी डॉ नाईक यांनी महापौरांसह उपमहापौर, स्थायी समिती सभापती, पालिका आयुक्त, सर्व नगरसेवक, पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, पदाधिकारी आणि विशेष करुन नवी मुंबईतील सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन केले आहे.