आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न
नवी मुंबई:- वाशी नवी मुंबई येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय करण्याकरिता 285 गाळ्यांचा 9 वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सततच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून सदर 285 गाळ्यांचा बांधकामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक व अध्यक्ष श्री. सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण, शंकरशेठ पिंगळे, रमेश किस्ते, अभियंता पांडुरंग पिंगळे, कैलास ताजणे, रामदास चासकर, अँड. राहुल पवार तसेच शेकडो व्यापारी उपस्थित होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील अतिरिक्त भाजीपाला आवारात सन 2009 पासून भाजीपाला व्यापारहोत नसल्याने तेथील बंद गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची परवानगी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने दिली गेली होती. एपीएमसीतील अतिरिक्त भाजीपाला आवारामधील गाळेधारकांना कृषीपूरक शेतमाल विक्रीकरिता परवानगी देण्यासाठी त्यांनी पणन विभाग व शासन दरबारी पाठपुरावा केला होता. अतिरिक्त भाजीपाला आवारातील 285 गाळ्यांमध्ये भाजीपाला व्यवसाय होत नसल्याने गेल्या 9 वर्षापासून हे गाळे बंद होते. त्यामुळे या गाळ्यांमध्ये कृषीपूरक व्यवसाय सुरु करण्याची मागणी गाळेधारकांकडून करण्यात येत होती. या गाळेधारकांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची भेट घेतली असता त्यानुसार आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्याचा पाठपुरावा केला होता. त्यावेळी कृषी पूरक व्यवसाय करण्यास परवनागी देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात येऊन सदर गाळ्यांच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला. ए.पी.एम.सी. चे प्रशासक व अध्यक्ष श्री. सतीश सोनी यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत सांगितले कि, ताईंच्या कष्टाने या 285 व्यापाऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला असून आज ताईंच्या हस्ते जसे बांधकामाचे भूमिपूजन झाले आहे, तसेच येत्या 4 महिन्यात सदर गाळे तयार करून या संपूर्ण 285 गाळ्यांचे उदघाटनही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याच हस्ते करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, गेल्या 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न घेऊन येथील व्यापाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिले असता मी राज्याचे तत्कालीन पणन मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांजकडे सदरबाबत सतत पाठपुरावा करून त्याकरिता 3 बैठका घेऊन हा प्रश्न पूर्णत्वास नेला. त्याकरिता त्वरित निर्णय घेणाऱ्या मा. मंत्री महोदय श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचेही आभार मानावे तेवढे कमी आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील अतिरीक्त भाजीपाला आवारात कृषीपूरक व्यवसाय आता करण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे. आज व्यापारांचा व त्यांच्या कुटुंबियांचा आनंद पाहून समाधान वाटत असल्याचे सांगत सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.