भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी वाहिलेली श्रद्धांजली
स्वयंम न्युज ब्युरो
मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीने एक महान नेता गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी अर्पण केली.
ते म्हणाले की, १९८० साली अटलजींच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपाची स्थापना झाली त्यावेळी त्यांनी‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ अशी भविष्यवाणी केली होती. आज ती भविष्यवाणी खरी ठरली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीची उभारणी केली. अफाट परीश्रम करून अटलजींनी भाजपाला राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी पक्ष बनवला. भाजपाला यशस्वी करताना त्यांनी कोणतीही वैचारिक तडजोड केली नाही. त्यांच्या महान कर्तृत्वामुळेच भाजपाला एक वेगळा पक्ष म्हणून ओळख मिळाली.
त्यांनी सांगितले की, भाजपा आज देशातील पहिल्या क्रमांकाचा यशस्वी पक्ष झाला आहे, त्यामध्ये अटलजींचे फार मोठे योगदान आहे. भाजपाला विजयी करतानाच त्यांनी विविध राजकीय पक्षांना सोबत घेऊन आघाडीचे राजकारण यशस्वी करून दाखविले. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष असताना त्यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले आणि देशाच्या विकासाला गती दिली. पत्रकार, राजकारणी, लेखक, कवी, वक्ता अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीरित्या निभावल्या. भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर करोडो भारतीयांनी त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.