मुंबई : मोठ्या शहरात गाडी पार्किंगवरुन नेहमीच किरकोळ वाद होतात. मात्र, मुंबईत पार्किंग वादावरुन एका व्यक्तीला १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सन २०१४ साली ही घटना घडली होती. या प्रकरणात महिलेच्या तक्रारीनंतर न्यायालयानेे संबंधित व्यक्तीला १ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
एका व्यक्तीचा गाडी पार्किंगवरुन एका एअर होस्टेससोबत वाद झाला होता. संबंधित महिला ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती, त्यावेळी आरोपीची कार अशा ठिकाणी लागली होती, जी बाहेर काढणे अवघड बनले होते. त्यामुळे आरोपीने महिलेला काही अपशब्द सुनावले. तुमच्यासारख्या उच्चभ्रू लोकांमुळेच आमचं जगण कठीण झालयं, तू आणि तुझ्या खरचे या बिल्डींगला कलंक आहेत, असे या व्यक्तीने महिलेला सुनावले. त्यामुळे आरोपीने महिलेच्या स्वाभीमानाला ठेस पोहचविली असून सार्वजनिक ठिकाणी अशी वर्तणूक अशोभनीय असल्याचे सांगत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
महिलाने न्यायालयात सांगितले की, या घटनेच्या दोन महिन्यांनंतर मी वडिल आणि बहिणीसोबत बाहेर जात होते. त्यावेळी पुन्हा हा व्यक्ती आमच्यासमोर आला. त्यावेळी, मी त्यांना समजावून सांगताना, यापुढे कुठल्याही महिलांशी असे न वागण्याचा सल्ला दिला. त्यावेळी आरोपीने माझ्या वडिलांसोबत वाद घालत असभ्य भाषा वापरली. तसेच जा, जे करायचेय ते करा, असेही अरेरावीने बोलल्याचे महिलेने न्यायालयात सांगितले.