नवी मुंबई :- नवी मुंबई जिल्हा भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वाशी येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बेलापूरच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे , भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ राजेश पाटील , कृष्णा पाटील , नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवक , नगरसेविका , भाजपा युवा , महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अटलजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात भारताचे महान सुपुत्र भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे उत्तुंग उंची लाभलेलं ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते . पत्रकार , साहित्यिक , कवी मनाच्या अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या आयुष्यात नैतिक मूल्यांशी कधीही तडजोड केली नसल्याचे सांगितले तर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने भाजपची मोठी हानी झाल्याचे आपल्या मनोगतात बोलताना सांगितले. महामंत्री डॉ राजेश पाटील यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची महंती सर्वदूर पसरल्याचे सांगितले . यावेळी भाजपा नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.