काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांचे बुधवारी सकाळी दिल्लीत ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. काँग्रेसमधील अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जायचे. काँग्रेसमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पडत संघटनकौशल्य सिद्ध केले होते. त्यांच्या निधनाने मुंबई आणि महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
गुरुदास कामत हे कामानिमित्त दिल्लीत गेले होते. बुधवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोवर त्यांचे निधन झाले होते.
गुरुदास कामत यांनी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले असून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. राज्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क असायचा. गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली आणि दीव व दमण या राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले.
गेल्या काही वर्षांपासून मात्र गुरुदास कामत पक्षनेतृत्वावर नाराज होते. राहुल गांधी यांनी मुंबईसंदर्भात संजय निरुपम यांना झुकते माप दिल्याने ते नाराज झाले. त्यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामाही दिला होता. मात्र, काही दिवसांनी त्यांची नाराजी दूर झाली व ते पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
गुरुदास कामत यांनी १९७२ मध्ये विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. १९७६ मध्ये त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपद भूषवले. १९८४ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. काँग्रेसप्रणित यूपीएच्या कार्यकाळात २००९ ते २०११ या कालावधीत ते केंद्रीय राज्यमंत्री होते. २०१४ मधील निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी कामत यांचा पराभव केला होता.
000000000000000000
कामत यांच्या निधनानं उत्कृष्ट संघटक व सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता गमावला- मुख्यमंत्री
माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनाने एक उत्कृष्ट संघटक आणि सर्वसामान्यांशी बांधिलकी असणारा नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणालेत, कामत यांचा मुंबईतील सर्व स्तरातील नागरिकांशी अतिशय निकटचा संबंध होता. तसेच या महानगरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने आग्रही असत. उत्कृष्ट संघटन कौशल्यासोबत अभ्यासू आणि सडेतोड भूमिका घेणाऱ्या कामत यांचे राजकारणासोबत विविध क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. आपल्या पक्षासह केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या होत्या. त्यांच्या निधनाने मुंबईच्या राजकीय क्षेत्राने सर्वसामान्यांशी जोडलेला एक महत्त्वाचा नेता गमावला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
एक लढवय्या कार्यकर्ता गेला
कॉंग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या दुःखद निधनाने एक लढवय्या कार्यकर्ता गेला आहे.कार्यकर्त्यांशी खूप जवळीक असलेला आणि त्यांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होत असत. विद्यार्थी दशेतूनच आपल्या राजकीय कार्याला त्यांनी सुरवात केली होती.आयुष्यात संघर्ष करून ते काँग्रेसच्या जेष्ठ नेतेपदी विराजमान झाले होते. त्यांच्या दुःखद निधनाने काँग्रेस पक्षाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले असून ही पोकळी भरून काढता येणार नाही. मी व माझ्या भाजपा पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच इश्वरचरणी प्रार्थना करतो.
गोपाळ शेट्टी, खासदार, उत्तर मुंबई
—————————-
दुःखद निधन झाल्याचे समजल्यावर मला धक्का बसला
काँग्रेसचे जेष्ठ नेते गुरुदास कामत यांचे आज सकाळी दुःखद निधन झाल्याचे समजल्यावर मला धक्का बसला.आमचे राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी आमची दोघांची जुनी मैत्री होती.मी खासदार नसतांना त्यांच्या डी. एन.नगर येथील कार्यालयात एका कामानिमित्त गेलो असतांना त्यांनी मला सहकार्य केले होते.दिल्लीत आल्यावर कधी आमची भेट व गप्पा होत असत.
त्यांच्या दुःखद निधनाने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले असून त्याची पोकळी भरून काढता येणार नाही.
गजानन कीर्तिकर, खासदार, उत्तर पश्चिम मुंबई