नवी मुंबईतून विविध माध्यमातून करणार केरळ पूरग्रस्तांना मदत
नवी मुंबई:- केरळ राज्यातील पूरग्रस्तांना विविध माध्यमातून मदत व्हावी याकरिता नवी मुंबई केरला समाजाची बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक संपन्न झाली. नवी मुंबईतून व्यापारी, बिल्डर, उद्योजक यांनी सढळ हस्ते केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.नवी मुंबई महानगरपालिका, सिडको अशा स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही रु. 50-50 लाखांची मागणी केली असून त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश केरला समाजाचे सचिव श्री. दामोदर पिल्ले, नवी मुंबई उपाध्यक्ष शशी नायर,रविकुमार नायर, श्रीमती अंबिका नायर उपस्थित होते.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, केरळ राज्यामध्ये पुराने थैमान घालून आपत्त्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील अनेक घरे उध्वस्त झाली असून पूरग्रस्तांना अनेक राज्यातून, संस्थांमार्फत विविध माध्यमातून सहाय्य केले जात आहे. केरळ राज्य हा भारताचा अविभाज्य घटक असून त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. अशी आपत्तीजनक परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये कोणाच्याही मागे उभे राहण्याची महाराष्ट्र राज्याची संस्कृती आहे. अनेक संस्था,संघटना पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. मी सुद्धा माझ्या एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले आहे. आपल्या सर्वांची ही नैतिक जबाबदारी असून नवी मुंबईतील व्यापारी, बिल्डर, उद्योजक यांजकडून विविध माध्यमातून मदत मिळत आहे. अनेक व्यापारी, बिल्डरांनी धनादेश स्वरुपात मदत करण्याची सुरुवात केली आहे. सर्व संघटना, संस्था यांनीही केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या केरला समाजातील नागरिकांनीही आपल्या केरळ बांधवांसाठी जेवढे करता येईल तेवढे करणार असून नवी मुंबई महानगरपालिका, सिडको अशा स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही मागणी केली असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले. यावेळी नवी मुंबईतील केरला समाजाचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.