सारसोळेच्या जेटीवर नारळी पौर्णिमेची जय्यत तयारी
- सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रात बहूचर्चित व श्रध्देचा भाग असणार्यासारसोळे जेटीवर नारळी पौर्णिमेच्या उत्सवाची सारसोळेच्या युवा ग्रामस्थांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.
शनिवार, दि. २५ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा असल्याने हा सण सारसोळेच्या ग्रामस्थांकडून मोठ्या भक्तीभावाने, श्रध्देने गेल्या अनेक वर्षापासून पिढ्या न् पिढ्या साजरा करण्यात येत आहे. नारळी पौर्णिमेच्या उत्सवानंतर होड्या मासेमारीसाठी खाडीत जात असल्याने हा उत्सव सारसोळे ग्रामस्थांसाठी भावनिक बाब आहे.
गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने सारसोळे जेटीवर जंगली गवत वाढले होते. नारळी पौर्णिमा हा सारसोळेचा उत्सव गेल्या काही वर्षापासून बहूचर्चित होवू लागल्याने या उत्सवात नवी मुंबईकरांचे सहभागी होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. या उत्सवात नवी मुंबई सर्वपक्षीय राजकारणी, सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील घटकही सहभागी होत असतात. विशेष म्हणजे नवी मुंबईतील पत्रकारही या उत्सवात घरचा कार्यक्रम समजून सहभागी होत असतात.
संततधार पाऊस असतानाही सारसोळेचे युवा ग्रामस्थ सारसोळे जेटीवर स्वच्छतेच्या व सफाईच्या कामात व्यस्त आहेत. जेटी परिसराची पूर्णपणे सफाई करण्यात आली आहे. जेटीच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्यात आली असून जेटी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. सकाळी ९.३० वाजता सारसोळे गावातील होळी मैदानानजिक असलेल्या कोलवाणी माता मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरूवात होणार आहे. हा पालखी सोहळा सारसोळे जेटीपर्यत असून त्यानंतर खाडीमध्ये नारळ विसर्जित करण्यात येणार आहे. या उत्सवात नवी मुंबईकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन सारसोळेच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.