सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
सर्व वर्गखोल्यांमध्ये बसविले डिजिटल बोर्ड
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची कोपरखैरणे सेक्टर ५ येथील क्रमांक ३५ आणि ७२ची अनुक्रमे मराठी आणि हिंदी माध्यमाची शाळा संपूर्ण डिजिटल बनली आहे. आमदार संदीप नाईक यांच्या १६ लाख रुपये स्थानिक आमदार विकास निधीतून या शाळांमधील सर्वच्या सर्व १६ वर्गात डिजिटल बोर्ड बसविण्यात आले आहेत.
मराठी माध्यमाच्या शाळेत अगोदरच डिजिटल बोर्ड बसविण्यात आले होते. हिंदी माध्यमाच्या वर्गांमध्ये अलिकडेच बसविण्यात आलेल्या डिजिटल बोर्डाचे उदघाटन शुक्रवारी आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नगरसेवक शंकर मोरे, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
खाजगी शाळांच्या तोडीसतोड पालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आमदार निधीतून डिजिटल शिक्षणाच्या सोयी शहरातील विविध पालिकेच्या शाळांमध्ये उपलब्ध केल्याचे आमदार नाईक मनोगतात म्हणाले. आपल्या पाल्यांनाही पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण व्हावा इतपत या शाळांचा दर्जा वाढविण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेश नाईक यांच्या शिक्षण व्हिजन धोरणानुसार अलिकडेच पालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे आणि नेरुळ येथे दोन सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरु केल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा अगोदरच सुरु झाल्या आहेत. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल आणि आध्ाुनिक शिक्षणाच्या सोयी निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शासनाने आश्वासन देवूनही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे काही कमी केले नाही मात्र डिजीटल बोर्ड उपलब्ध करुन आमदार संदीप नाईक यांनी खर्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे कमी केल्याची प्रतिक्रीया नगरसेवक शंकर मोरे यांनी दिली. आपल्या प्रभाग क्रमांक ४६मध्ये अल्प उत्पन्न गटांतील नागरिक राहत असून त्यांच्या मुलांना आमदार नाईक यांनी आपण केलेल्या विनंतीनुसार डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध केल्याबददल त्यांचे आभार मानले.
डिजिटल बोर्डमुळे अभ्यासातील आमची उत्सुकता वाढली असून गुगल, युटयूबच्या माध्यमातून आम्ही नवनवीन माहिती गोळा करीत असतो.
– तनुजा पाटील, विद्यार्थीनी, इयत्ता सहावी, मराठी माध्यम
आजचा विद्यार्थी हा जिज्ञासू वृत्तीचा आहे. आधुनिक गोष्टींचे तो निरिक्षण करीत असतो. डिजिटल बोर्डामुळे त्याच्या या तंत्रस्नेही वृत्तीला प्रोत्साहनच मिळाले आहे.
– पुष्पलता पाटील, मुख्याध्यापिका, मराठी शाळा क्र. ३५
डिजिटल बोर्डमुळे विद्यार्थी वर्गात बसण्याकडे आकर्षित होत असून अभ्यासातही त्यांची रुची वाढली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील वाढली आहे.
– जयप्रकाश पाल, मुख्याध्यापक, हिंदी शाळा क्र. ७२
गुणवंतांचा सन्मान
डिजिटल बोर्डांच्या उदघाटनाप्रसंगी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती परिक्षेत नवी मुंबईत चौथा क्रमांक पटकाविलेली तनुजा पाटील तसेच स्काउट-गाईडमध्ये राज्य पुरस्कारप्राप्त केलेल्या प्रियंका चव्हाण, निशा खवले, सुप्रिया शेडगे, मानसी चाळके, साक्षी भदरगे, निकिता भगत आणि ऐश्वर्या कळम्बे या विद्यार्थींनींच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली.