नवी मुंबई:- नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना 1972 नंतर अखेर न्याय मिळाला असून बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास सुरुवात झाली होती. नवी मुंबईतील जमिनी संपादित केल्यानंतर गावठाणांचे ठाणे जिल्हाधिकारी मार्फत सर्वेक्षण पूर्ण होऊन मालमत्ता पत्राचे वाटप करण्यास प्रत्येक गावात सुरुवात झाली आहे. “शासन आपल्या दारी” कार्यक्रमांतर्गत सिटी सर्वेक्षण झालेल्या गावातील ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वितरणास प्रत्येक गाव निहाय सुरुवात झाली असून आज दि.24.08.2018 रोजी नेरूळ गावातील 565 ग्रामस्थांना बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले तसेच “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत शासकीय अधिकारी यांनी स्वतः आपल्या दारात येऊन आपली मालमत्ता पत्रके वाटप केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त कृती समितीचे डॉ. राजेश पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न ज्या टप्प्याटप्याने आमदार मंदाताई यांनी सोडविला, त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. माजी नेत्यांनी सदर विषय हा गुंतागुंतीचा करुन ठेवला होता. त्यामुळे नगरविकास, जिल्हाधिकारी, सिडको, पालिका यांच्या संयुक्त निर्णयाशिवाय सदर प्रश्न सुटणे हे कठीन काम होते. आता सदर विषय आमदार मंदाताई यांनी सोडविल्यामुळे त्यांना श्रेय मिळू नये, याकरिता काही विरोधक ग्रामस्थांमध्ये चुकीचे संदेश पसरवून दिशाभूल करीत आहेत. मी स्वतः प्रकल्पग्रस्तांसाठी काम करीत असल्याने ज्या प्रकारे ताईंनी या विषयाची हाताळणी केली व प्रश्न पूर्णत्वास नेला त्याबद्दल खरेच मी त्यांचे ग्रामस्तांच्या वतीने आभार मानत असल्याचे डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.
नवी मुंबई हे विकसित शहर असून शहराच्या विकासासाठी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100% जमिनी दिलेल्या आहेत. गावठाणातील ग्रामस्थांची बांधलेली घरे नियमित करावीत, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, या संदर्भात बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी अनेकवेळा शासनदरबारी पाठपुरावा केला होता. नगरविकास प्रधान सचिव नितीन करीर, सिडको तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी तसेच तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांजबरोबरही सदर संदर्भात अनेक बैठकी झाल्या होत्या तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मालमत्ता पत्रके (प्रॉपर्टी कार्ड) मिळावे हा अनेक वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागावा, याकरिता आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गावागावात जाऊन प्रकल्पग्रस्तांसह गावबैठकाही घेतल्या होत्या.बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश येऊन नवी मुंबई गावठाणक्षेत्रातील प्रत्येक गावनिहायप्रकल्पग्रस्तांच्या घरांना प्रॉपर्टी कार्ड वाटपास सुरुवात करण्यात आली होती.आमदार सौ, मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातूनस्वतः शासकीय अधिकारी शासन आपल्या दारी अंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरण करणार असल्याने सर्व प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी हा मोठा निर्णय असून गावठाणातील प्रत्येक घरांस आपल्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असल्याने आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा प्रकल्पग्रस्तांना मिळत आहे. त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मालमत्ताबाबत कायदेशीर प्रक्रिया व घरे विकसित करण्याकरिता येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.अनेक वर्षापासुनचा सदर प्रश्न मार्गी लागल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नेरूळ गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाकडून बेलापूरच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक केले जात आहे.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, मी स्वत: गावात राहत असल्याने नवी मुंबईतील ग्रामस्थांनी त्यांच्या 100% जमिनी दिलेल्या असताना नवी मुंबईतील गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रत्येक घराला मालमत्ता पत्रके(प्रॉपर्टी कार्ड) देण्यात यावे, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस तसेच शासनदरबारी अनेक वेळा पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी यांजसमवेतही अनेक बैठकी पार पडल्या. सदर प्रश्नाबाबत गावागावात ग्रामस्थांच्या बैठकीही घेतल्या गेल्या. त्यांना आपल्या मालकी हक्काचा कायदेशीर पुरावा मिळाला असल्यामुळे अनियमित घरे नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या अनेक वर्षापासुनचा सदर प्रश्न हा माजी नेत्यांनी जाणूनबुजून ताटकळत ठेवला होता. सदर प्रश्न सुटू नये याकरिता काही माजी नेत्यांचा प्रयत्न सुरु होता. त्यामुळे शासनदरबारी पाठपुरावा करत असतानाही अनेक संकटांचा सामना करावा लागत होता. सदर प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चुकीचे संदेश पसरवून दिशाभूल करण्याचा प्रकार सुरु असून येत्या 8 दिवसात विस्तारित गावठाणाचाही सर्वेक्षण सुरु होणार आहे. त्यामुळे विस्तारित गावठाणाच्या नावाखाली ग्रामस्थांची दिशाभूल करीत असलेल्या अफवांवर ग्रामस्थांनी विश्वास न ठेवण्याचे आवाहनही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
यावेळी परीक्षण भूमापक श्री. सुधीर सारे,वरिष्ठ लिपिक श्री.धनंजय बहाडकर, डॉ. राजेश पाटील, राजू तिकोने, हिराजी पाटील गुरुजी, भोईर गुरुजी तसेच असंख्य प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.