कामिनी पेडणेकर
नवी मुंबई : नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांना चालना मिळण्याचे दिवस आता खर्या अर्थाने सुरु होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर एकीकडे मनसेकडे काढलेली दिंडी व दुसर्याच दिवशी भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या कंत्राटी कामगारांच्या समस्येवर कंत्राटी कामगारांसमवेत पालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याने कंत्राटी कामगारांच्या समस्यांना आता वाचा फुटू लागल्याचा आशावाद कंत्राटी कामगारांकडून व्यक्त केला जावू लागला आहे.
नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांचे प्रलंबित प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आज १२ सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. दरम्यान, कंत्राटी कामगारांनी आपापसातील मतभेद बाजुला ठेवून कामगारांच्या हिताचा विचार करुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जुलै २०१२ ते २३ फेब्रुवारी २०१५ पर्यंतचा महागाई भत्त्याचा फरक आणि २४ फेब्रुवारी २०१५ पासूनचा सुधारीत किमान वेतनाचा २७ महिन्यांचा फरक त्वरित मिळणे, सर्व कामगारांचा सामुहिकपणे अपघात विमा उतरवणे, माथाडी कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांना देखील घरकुल योजनेत सामावून घेणे तसेच पाणी पुरवठा, मल:निस्सारण, घंटागाडी, विद्युत विभाग इत्यादी विभागातील कामगारांना त्यांच्या पदाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, आदि मागण्यांचा समावेश आहे.
तसेच सर्व कामगारांचा मासिक पगार महिन्याच्या ५ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा. पाणी पुरवठा/मल:निस्सारण विभागातील कामगारांना पगाराची पावती एकसारखी एकाच फॉरमॅटमध्ये देण्यात यावी. कंत्राटी कामगारांचे काम कायम स्वरुपी असल्याने त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करावे. समान काम समान वेतन पूर्ववत लागू करण्यात यावे, अशा अनेक प्रश्नांवर महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
मंदाताई म्हात्रे या आमदार झाल्यापासून सातत्याने कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर लक्ष घालत असून त्या स्वत: कंत्राटी कामगारांच्या समस्येवर सातत्याने पालिका प्रशासनाशी चर्चा करत आहेत. यापूर्वीच्या प्रस्थापितांनी कधीही कामगारांसमवेत येवून पालिका आयुक्तांशी चर्चा केली नसल्याचे कंत्राटी कामगारांकडून उघडपणे बोलले जावू लागले आहे. कायम सेवाप्रकरणी कंत्राटी कामगारांना खोटे आश्वासन देवून पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या भावनेशी खेळ केला असल्याचा संतापही कंत्राटी कामगारांकडून व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबईतील ग्रामस्थ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील घटक, सर्वधर्मियांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार आणि आता कंत्राटी कामगारांच्या समस्येवर विचारविनिमय करण्यासाठी आमदार मंदा म्हात्रेंची उपस्थिती या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रें जनसंपर्काच्याबाबतीत इतरांपेक्षा कैक पटीने आघाडीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.