नवी मुंबई: ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून १६ सप्टेंबर रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबईतील व्यापारी वर्गाच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत व्यापार्यांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी भरण्यात येत असलेला आठवडा बाजार बंद करण्याच्या सुचनेबाबत उल्लेख करण्यात आला होता. त्याअनुषंगाने नवी मुंबईतील आठवडे बाजार बंद करण्याचा ‘भाजप’चा घाट या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले असून त्याअनुषंगाने शिवसेनेचे वाशी उपशहरप्रमुख प्रफुल्ल म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
सदर वृत्ताचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मात्र खंडन केले आहे. वास्तविक पाहता नवी मुंबईतील आठवडे बाजार बंद करण्याचा ‘भाजप’चा कोणताही प्रयत्न नसून फक्त आठवडा बाजारात व्यवसाय करण्याकरिता चेंबूर, गोवंडी, मानखुर्द येथून येणार्या फेरीवाल्यांना रोखण्याचा प्रयत्न आहे. शिवाय सदरची बैठक व्यापार्यांना भेडसावणार्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती. नवी मुंबईतील आठवडा बाजारात नवी मुंबईतील स्थानिक फेरीवाल्यांनी व्यापार करावा, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. वाशी येथील मार्केटसाठी मी स्वतः माझ्या आमदार निधीमधून १कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे विरोधक जाणूनबुजून अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध करून फेरीवाल्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे.
आठवडे बाजारातील सर्वच फेरीवाले बाहेरून आलेले असून स्थानिक फेरीवाले करदाता असतानाही देखील त्यांना याचा मोठा फटका बसत आहे. बाहेरुन आलेले फेरीवाले स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरुन अनधिकृतपणे व्यापार करतात. शिवाय नवी मुंबईतील प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवशी भरणार्या आठवडे बाजारामुळे बाहेरुन येणार्या फेरीवाल्यांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक पार्किंगची समस्या, चोरांचा सुळसुळाट वाढून चेन स्नॅचिंग, खिसे कापू (पॉकेट मारी), महिलांची छेडछाड असे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
आठवडे बाजारात स्थानिक फेरीवाल्यांनीच व्यापार करावा यासाठी मी आग्रही असून तो आमचा प्रमुख उद्देश आहे. परंतु, बाहेरुन आलेल्या फेरीवाल्यांकडून मिळणारा मलिदा बंद होईल, या भितीमुळे काही विरोधक ‘भाजप’च्या विरोधात अपप्रचार करीत असून फेरीवाल्यांची दिशाभूल करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. पण, आता नवी मुंबईतील फेरीवाले सुज्ञ झाले असून अशा प्रकारच्या अफवांना ते बळी पडणार नसल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.