मुंबई : काँग्रेसचे चांदिवलीचे आमदार आणि माजी मंत्री आरिफ नसीम खानयांच्यावर पैशांच्या नोटांची उधळण करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पैशांची उधळण करणारा मनसेचा कार्यकर्ता असल्याचेही बोलले जात आहे.
नसीम खान हे भानुशाली समाजाच्या गणेशोत्सवाला गेले होते. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पैशांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले. दोन्ही बाजुला उभ्या असलेल्या दोन कार्यकर्त्यांनी सलग काही मिनिटे त्यांच्यावर पैशांच्या नोटांची उधळण केली. हा सर्व प्रकार सुरु असताना नसीम खान यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत होते. पैशांची उधळण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
भानुशाली समाजाच्या गणेशोत्सवाला मी गेलो होतो. तिथे मंडपात दोन जण माझ्यावर पैशांची उधळण करू लागले. मी काही वेळेसाठीच तिथे गेलो होतो. मी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला. पण त्यांच्या परंपरेत अडथळा आणणे मला योग्य वाटले नाही. मी असे काही केले असते तर वाद निर्माण झाला असता. मी पैसे उधळलेले नाहीत. माझ्या हातून कोणतेही चुकीचे काम झालेले नाही’, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रश्नच येत नाही, असे नसीम खान यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले. दरम्यान, नसीम खान यांच्यावर ज्या पैशांची उधळण करण्यात आली होती, ते पैसे गरीबांना आणि गोशालाला दान करण्यात आल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महेंद्र भानुशाली यांनी गणेशोत्सवादरम्यान काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर नोटा उधळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर मनसे आणि काँग्रेसकडून भाजपला टार्गेट केले जात आहे. अशा परिस्थितीत नसीम खान यांच्यावर ५०० रुपये किंमतीच्या नोटांचा पाऊस पाडण्यात आल्याने काँग्रेस आणि मनसे दोन्ही पक्ष वादात आले आहेत. शहरातील घाटकोपर परिसरात रविवारी हा प्रकार घडला असून या प्रकाराचा व्हिडियो व्हायरल झाला आहे.
मनसेचा गुजराती चेहरा म्हणून महेंद्र भानुशाली हे ओळखले जातात. भानुशाली यांच्या आईला मनसेकडून या आधी निवडणुकीसाठी पक्षाचे तिकीट देण्यात आले होते. यासंदर्भात नसीम खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्हिडिओ जुना असल्याचे सांगितले. तसेच मी त्यावेळी कार्यकर्त्यांना नोटा उधळण्यास मनाई केली होती. मात्र, त्यांनी माझे ऐकले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.