नवी मुंबई : गौरीगणपतीचा सण संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. श्रीगणेशोत्सवात गौरींसह विसर्जित होणा-या मोठ्या प्रमाणावरील श्रीगणेशमूर्तींची संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील 23 विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेमार्फत ठेवण्यात आलेल्या चोख व्यवस्थेमध्ये दीड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जन सोहळ्याप्रमाणेच पाचव्या दिवशीही विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 23 विसर्जनस्थळांवर एकुण 15839 श्रीगणेशमुर्तींचे 1329 गौरींसह सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले.
विसर्जन सोहळ्यात बेलापूर विभागात 5 विसर्जन स्थळांवर 2427 घरगुती, 39 सार्वजनिक व 116 गौरी, नेरूळ विभागात 2 विसर्जन स्थळांवर 2553 घरगुती, 48सार्वजनिक व 289 गौरी, वाशी विभागात 2 विसर्जन स्थळांवर 1253 घरगुती, 30 सार्वजनिक व 80 गौरी, तुर्भे विभागात 3 विसर्जन स्थळांवर 1215 घरगुती, 24सार्वजनिक व 69 गौरी, कोपरखैरणे विभागात 2 विसर्जन स्थळांवर 2910 घरगुती, 25 सार्वजनिक व 465 गौरी, घणसोली विभागात 4 विसर्जन स्थळांवर 2661 घरगुती, 48 सार्वजनिक व 120 गौरी, ऐरोली विभागात 3 विसर्जन स्थळांवर 1713 घरगुती, 34 सार्वजनिक व 119 गौरी, दिघा विभागात 1 विसर्जन स्थळावर 858 घरगुती, 01सार्वजनिक व 71 गौरी अशाप्रमाणे एकुण 23 विसर्जन स्थळांवर 15590 घरगुती व 249 सार्वजनिक अशा एकूण 15839 श्रीगणेशमुर्तींचे व 1329 गौरींचे विसर्जनभावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
गौरींसह विसर्जीत होणा-या श्रीगणेशमुर्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर असते याचे भान ठेवून अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली, परिमंडळ १ चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व परिमंडळ २ चे उप आयुक्त श्री. अमरिश पटनिगीरे यांच्यासह आठही विभागांचे सहा.आयुक्त – विभाग अधिकारी यांच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील 23 विसर्जनस्थळांवर आवश्यक अशी सर्व व्यवस्था पुरविण्याकडे काटेकोर लक्ष देण्यात आले होते. त्यामुळे विसर्जनास्थळी आलेल्या गौरी-गणपतींचे अत्यंत भावपूर्ण वातावरणात सुव्यवस्थित रितीने विसर्जन संपन्न झाले. सर्व आठही विभागातील अधिकारी – कर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डस् यांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली.
श्रीमूर्ती विसर्जनाकरीता सर्व ठिकाणी तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती असतात अशा आवश्यक ठिकाणी फोर्कलिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती. विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबुचे बॅरेकेटींग करण्यात आले होते तसेच विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्याठिकाणी पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करण्यासाठी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली होती.
विसर्जनस्थळांपैकी ‘तलाव व्हिजन’ अंतर्गत सुशोभित करण्यात आलेल्या १४ मुख्य तलावांमध्ये गॅबियन वॉल निर्धारीत क्षेत्रातच भाविकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गौरी व श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करून पर्यावरण जपणुकीच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या आवाहनास उत्तम सहकार्य दिले. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जनस्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे शक्य झाले व गर्दीचे नियोजन करणे तसेच विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यात मोलाची मदत झाली. सर्वच ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिका अग्निशमन दलासह पोलीस यंत्रणाही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज होती.
विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान, प्लास्टिक अशा “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशा महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू भाविक स्वतंत्र कॅरेटमध्ये ठेवत असून त्यांचे नंतर गरजू मुलांना व नागरिकांना वितरण करण्यात येत आहे.
श्रीगणेशमुर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी सर्वच 23 विसर्जन स्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून पुढील सातव्या व दहाव्या दिवशीच्या विसर्जन सोहळ्यासाठी नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे असे आवाहन महापौर श्री. जयवंत सुतार व महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.