सिडको महागृहनिर्माण योजना – २०१८ संगणकीय सोडत २ ऑक्टोबर रोजी
सिडको महागृहनिर्माण योजना – २०१८ करिताच्या संगणकीय सोडत समारंभाचे आयोजन दि. ०२ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता, ७ वा मजला, सिडको सभागृह, सिडको भवन, बेलापूर येथे करण्यात आले आहे. सदर योजनेकरिता पात्र ठरलेल्या अर्जदारांमधून ही सोडत काढण्यात येणार आहे. सदर संगणकीय सोडत पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. या समितीमध्ये निवृत्त (भाप्रसे) अधिकारी व माजी उपलोकायुक्त, महाराष्ट्र राज्य, श्री. सुरेश कुमार, एनआयसी मुंबईचे श्री. मोईझ हुसेन व म्हाडातील अधिकारी यांचा समावेश असेल.
सदर गृहनिर्माण योजना हे प्रधानमंत्री आवास योजनेतील “सर्वांसाठी घरे” या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सिडकोचे एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. सदर योजनेतील एकूण १४,८३८ घरांपैकी ५२६२ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तर ९५७६ सदनिका या अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या ५ नोड्समध्ये ११ ठिकाणी ही गृहनिर्माण योजना साकार होत आहेत. सदर योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते १३ ऑगस्ट २०१८ रोजी करण्यात आला होता.
या निकालाबद्दल अर्जदारांमध्ये असलेली उत्सुकता व त्यामुळे सोडतीच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, उपस्थितांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सिडकोतर्फे सदर संगणकीय सोडत समारंभाचे www.cidco.maharashtra.gov.in या सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर लाईव्ह वेबकास्ट करण्यात येणार आहे व यानंतर याच संकेतस्थळावर सोडतीचा निकालही त्वरित प्रसिद्ध करण्यात येईल. यामुळे अर्जदार आपल्या घरी वा कार्यालयात किंवा कोणत्याही ठिकाणी सदर संकेतस्थळावर सोडतीचा निकाल आपल्या सोयीने पाहू शकतात. तसेच, भविष्यात सोडतीच्या अनुषंगाने काही नवीन सूचना असल्यास त्या www.cidco.maharashtra.gov.in व https://lottery.cidcoindia.com या सिडकोच्या अधिकृत संकेस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. जे अर्जदार सोडतीमध्ये यशस्वी ठरतील ते वगळून, उर्वरित अर्जदारांनी भरलेली अनामत रक्कम त्यांच्या अर्जातील नमूद बॅंक खात्यामध्ये सोडतीच्या दिनांकापासून १५ दिवसांत परस्पर जमा केली जाईल, असे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे.