* लवकरच होणार भूमिपूजन* जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात आमदार मंदाताई म्हात्रे यांची घोषणा
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका आयोजित जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, जेष्ठ नागरिकांचा सत्कार व विविध स्पर्धांचा पारितोषिक समारंभ कार्यक्रम नुकताच वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात 75 वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांचा तसेच विवाहास 50 वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिक दांपत्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठ नागरिकांना ओल्ड एज होम करिता भूखंड मिळाला असल्याची घोषणा करीत लवकरच भूमिपूजन होणार असल्याचे सांगून जेष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी दिली. यावेळी उपस्थित शेकडो जेष्ठ नागरिकांनी एकच जल्लोष केला.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी मुंबईमध्ये ओल्ड एज होम उभारणेकरिता भूखंड उपलब्ध करणेसंदर्भात सिडकोकडे मागणी केली होती. सिडकोनेही जेष्ठ नागरिकांकरिता भूखंड देणार असल्याचे सांगितले. सदर भूखंड पालिकेकडे हस्तांतरित केल्यास महापालिकेनेही जेष्ठांसाठी ओल्ड एज होम बांधण्यास तयारी दर्शविली आहे. सदर बाबत सातत्याने पाठपुरावा करून सिडकोने बेलापूर से-19/20 येथे 1200 चौ.मी., सीवूड्स से-50 येथे 900 चौ.मी. तसेच सीवूड्स से-38 येथे 850 चौ.मी. यापैकी एक भूखंड जेष्ठ नागरिकांच्या ओल्ड एज होम करिता सिडकोने सूचित केले आहे. वयोवृद्ध दाम्पत्यांकडून इच्छामरणाच्या मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सर्वोच्च न्यायालयानेही इच्छामरणाला सशर्त मान्यता दिली असल्याने इच्छामृत्युचे प्रमाण वाढले आहे. विभक्त कुटुंब पद्धती आणि बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रम ही काळाची गरज बनली असूनज्येष्ठांनीही ती स्वीकारली आहे. छोटी छोटी कुटुंबे निर्माण झाल्याने आई-वडिलांवर एकाकी राहण्याची वेळ आली असून मुला-मुलींनाही स्वत:च्या आईवडिलांची जबाबदारी नकोशी वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांना ओल्ड एज होम मध्ये पाठविण्याचा विचार वाढायला लागला आहे. नवी मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशा ज्येष्ठांना आधार देण्याची गरज आहे. त्यांच्यावर इच्छामरण मागण्याची वेळ येऊ नये याकरिता नवी मुंबईमध्येही ओल्ड एज होम उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबईमध्ये ओल्ड एज होम उभारल्यास इच्छामरण मागण्यांही कमी होतील व असे ज्येष्ठ वयोवृद्ध एक चांगल्या आशेने जगतील म्हणून हा माझा एक प्रयत्न आहे. त्याकरिता माझ्या आमदार निधीमधून रु. 50 लाखाची तरतूद करण्यात असून आज जेष्ठ नागरिक दिनानिमित्त जेष्ठांकरिता भूखंड मिळाल्याची घोषणा करताना आनंद वाटत असल्याचे तसेच त्यांचा उत्साह व जल्लोष पाहून मन भरून आल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी अनेक जेष्ठ नागरिक व जेष्ठ महिला वर्गाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानले.