नवी मुंबई : वाशीतील कॉंग्र्रेस भवनात शनिवारी (दि. २९ सप्टेंबर) सांयकाळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा, पदाधिकार्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. अखिल भारतीय कॉंग्रेस सचिव बी.एम. संदीप व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणिस आणि नवी मुंबईचे निरीक्षक मोहम्मद तारीख फारूखी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा पार पडला.
नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणिस व माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, कॉंग्रेस प्रदेशचे चिटणिस संतोष शेट्टी, सुधीर पवार, कॉंग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते व माजी उपमहापौर अविनाश लाड, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, माजी नगरसेवक एकनाथ तांडेल, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते लीना लिमये, नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
या मेळाव्यात बुथस्तरीय कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. बुथस्तरीय पक्षसंघटनेचा आढावा घेण्यात आला. पक्षसंघटना वाढविताना कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेशी नाळ कायम ठेवून बुथस्तरावर पक्षसंघटना मजबूत करण्याचे आवाहन मोहम्मंद तारीख फारूखी यांनी केले.
यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पदाधिकार्यांकडे विविध तक्रारी मांडत आपल्याला पक्षसंघटनेत काम करताना येणार्या समस्यांचा पाढा वाचला. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करावयाची झाल्यास आघाडी लोकसभा, विधानसभेपर्यत सिमित न ठेवता ती आघाडी महापालिका निवडणूकीतही कायम ठेवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी यावेळी केला. विधानसभा व लोकसभेला घड्याळ ही निशाणी सांगताना पालिका निवडणूकीत स्वबळावर लढताना कॉंग्रेसचा पंजा पुन्हा बिंबविताना अडचणी येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. नवी मुंबईत कॉंग्रेस पक्षसंघटना वाढवायची असेल ऐरोली व बेलापुर या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ कॉंग्रेसने मागून घ्यावा अशी मागणीही कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॉंग्रेसचे माजी नगरसेवक व कॉंग्रेसचे अनुसूचित जाती-जमाती सेलचे नवी मुंबई अध्यक्ष अकुंश सोनवणे यांनी केले. या मेळाव्यात कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबईतील नगरसेवक, नगरसेविका, पक्षीय पदाधिकारी, अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.