नवी मुंबई:- बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून बांधण्यात आलेले एन.आर.आय. पामबीच सिग्नल, बेलापूर गाव मच्छीमार्केट, बेलापूर सेक्टर–15 ब्रह्मा हाऊस तसेच बेलापूर-उरण हायवे येथील बस थांबा निवारा शेडचे उदघाटन सोहळे नुकतेच पार पडले. सदर बस थांबा व निवारा शेडचे उदघाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व नवी मुंबई प्रभारी श्री. संजय उपाध्याय तसेच स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत अनेक बस थांब्याची अवस्था अतिशय दयनीय होती. बस थांब्याचे नुतनीकरण व निवारा शेड सारख्या सुविधा प्रवाशांना उपलब्ध व्हाव्यात, याकरिता अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग यांनी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मागणी केली होती. तदनंतर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातील विविध विभागातील बस थांबा ठिकाणचे सर्वेक्षण करून सदर बस थांबा निवारा शेड बांधणीकरिता आमदार निधीमधून निधी उपलब्ध करण्यात येईल,असे जाहीर केले होते. याच अनुषंगाने बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई बेलापूर मतदारसंघात एकूण 15 बस थांबा निवारा शेड बांधण्याकरिता निधी मंजूर करून आणण्यात आला आहे. त्यातील बेलापूर विधानसभा क्षेत्रातील एकूण 10 बस थांबे व निवारा शेड नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत तसेच 5 बस थांबे निवारा शेड लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले कि, अनेक जेष्ठ नागरिक व महिला वर्गाची सुसज्ज असे बस थांबे व निवारा शेड असावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. बेलापूर मतदारसंघाचा दौरा करताना अनेक बस थांब्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे निदर्शनास आले. तसेच तेथे पाऊस व उन्हापासून संरक्षणाकरिता निवारा शेडही नसल्याचे आढळले. याच अनुषंगाने माझ्या आमदार निधीतून बेलापूर विधासभा क्षेत्रात सद्यस्थितीत 15 बस थांबे व निवारा शेड उपलब्ध करण्यात आले असून पुढील वर्षात अजून बस थांबे निवारा शेड करिता निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, दीपक पवार, निलेश म्हात्रे,नितीन कंधारी, राजू तिकोणे, शर्मिला शंकर, समीर शहा, श्रीराम घाटे, आर.आर.पाटील, जेष्ठ नागरिक,महिला वर्ग व असंख्य नागरिक उपस्थित होते.