ठाणे : राज्याच्या ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला २०१९ अखेरपर्यंत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर दिले जाईल. तर, शहरी भांगातील कुटुंबासाठी २०२२ पर्यंत घरांचे नियोजन केले आहे. महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे राज्यमंत्री पदाच्या दर्जाचे अध्यक्षपद आरपीआयच्या एका नेत्याला येत्या तीन दिवसांत दिले जाईल, या घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यातील आरपीआयच्या (आठवले गट) मेळाव्यात केल्या.
ठाण्यातील हायलॅण्ड येथील मैदानात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह आयपीआयचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली, तरी अनुसूचित जाती आणि जमाती वाईट अवस्थेत जगत आहेत. काँग्रेस आघाडीने त्यांना कायम वाऱ्यावर सोडले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे पुतळे गावागावांत उभारले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आपल्या वडिलांचे पुतळेसुध्दा उभारले. मात्र, बाबासाहेब आंबोडकरांच्या पुतळ्यासाठी एक इंच जागा किंवा निधी त्यांनी दिला नाही. ते आम्हाला जातीयवादी म्हणून हिणवायचे. मात्र, आम्हीच बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी ठोस निर्णय घेतल्याने त्यांची राजकीय दुकानदारी बंद व्हायची वेळ आली आहे, असा हल्लाबोलसुध्दा मुख्यमंत्र्यांनी केला.
………..
… तर राज्य गहाण ठेवू
महामानवाला मानवंदना देण्यासाठी त्यांचे स्मारक उभारण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्य गहाण ठेवायला लागले, तरी तशी तयारी आमची आहे, असे विधानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले.
……..
गुन्हे मागे घेऊ
भीमा कोरेगाव हिंसेप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील, असा शब्द मी दिलेला आहे. मात्र, त्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यात विलंब होत असून मी दिलेला शब्द कधी खोटा ठरणार नाही याची खात्री बाळगा ,असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.