नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी याकरीता महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची आग्रही भूमिका असून या अनुषंगाने त्यांनी आज अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांच्या समवेत माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे पाहणी दौरा करुन मौलिक सूचना केल्या. यावेळी रुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षक डॉ. सविता रामरखियानी व वैदयकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड उपस्थित होते.
रुग्णालयात नवीन ऑक्सिजन गॅस पाईपलाईन यंत्रणा बसविण्यात आली असून प्रामुख्याने त्याची तपासणी करण्यासाठी आयुक्तांनी आज रुग्णालयास भेट दिली होती. यामध्ये ऑक्सिजन गॅस सिलिंडर ठेवण्याच्या ठिकाणी सुनियोजीत पध्दतीने रचना व व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रसुती कक्षाची तसेच प्रसुती पश्चात कक्षाची पाहणी करुन आयुक्तांनी त्या ठिकाणी लहान बालकांना रुग्णालयामार्फत घालण्यात येणारे कपडे एकरंगी असण्यापेक्षा चौकटीचे बहुरंगी असावेत अशा सूचना केल्या. लहान मुलांसाठी असलेले व्हेंटिलेटर लवकरात लवकर कार्यान्वित करणेबाबतही आयुक्तांनी निर्देश दिले.
रुग्णालयाची सर्वांगीण पहाणी करताना रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्थेत वाढ करणेबाबत त्यांनी आदेशित केले तसेच रुग्णालयातील अंतर्गत व बाहय भागाची उत्तम स्वच्छता राखण्याबाबतही आयुक्तांनी निर्देश दिले. आरोग्य विभागाकरीता भरती प्रक्रिया सुरु असून त्यामधून लवकरच नर्सेस उपलब्ध होतील, त्याशिवाय डॉक्टर्सचीही कमतरताही दूर करुन आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या पाहणी दौऱ्याप्रसंगी सांगितले.