नवी मुंबई : महानगरपालिका परिसरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे त्याचप्रमाणे मार्जिनल स्पेसचा गैरवापर, पदपथ व रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन, यांच्या निर्देशानुसार आठही विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे. याबाबत स्थायी समिती सभेतही विशेषत्वाने रस्त्यांवरील फेरीवाले व मार्जिनल स्पेसमध्ये व्यवसाय करणा-या गाळेधारकांवर प्रभावीपणे कारवाई होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात अनधिकृत फेरीवाले व मार्जिनल स्पेसवर धडक कारवाई हाती घेण्यात आली असून या कारवाई अंतर्गत एकूण 421 अनधिकृत फेरीवाल्यांवर व 104 मार्जिनल स्पेस वापर करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली असून माल जप्तीसोबतच रु.4 लक्ष 64 हजार पाचशे इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजीही अशाच प्रकारची कारवाई 127 अनधिकृत फेरीवाल्यांवर व 228 मार्जीनल स्पेसवर करण्यात आली होती व या कारवाईमध्ये रु. 8 लक्ष 8 हजार 200 इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली होती.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पदपथ हे नागरिकांना चालण्यासाठी व रस्ते हे वाहतुकीसाठी खुले यादृष्टीने त्याठिकाणी अनधिकृतरित्या व्यवसाय करुन रहदारीला अडथळा आणणा-या अनधिकृत फेरीवाल्यांवर व मार्जिनल स्पेसमध्ये व्यवसाय करणा-या व्यवसायिकांवर धडक कारवाई करण्यात येत असून यापुढील काळात ही कारवाई लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी अधिक प्रभावीपणे राबविली जाणार आहे.