नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांशी सुसंवाद साधत महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने विविध विभागातील स्वच्छताविषयक कामांचा तसेच नागरी सुविधा कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये अधिकारी वर्गासह भेटी देणार आहेत.
याबाबत पूर्व नियोजित 5 ऑक्टोबर 2018 रोजीचा ऐरोली विभागातील महापालिका आयुक्त भेटीचा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे 10 ऑक्टोबर 2018 रोजी होणार असून 06 ऑक्टोबर 2018 रोजीचा बेलापूर विभागातील पाहणी दौरा जाहीर केल्याप्रमाणे त्याच दिवशी होणार आहे.
महापालिका आयुक्तांच्या पाहणी दौ-याचे विभागनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.
बेलापूर विभाग – दि. 06 ऑक्टोबर 2018
ऐरोली विभाग – दि. 10 ऑक्टोबर 2018
तुर्भे विभाग – दि. 11 ऑक्टोबर 2018
घणसोली विभाग – दि. 16 ऑक्टोबर 2018
कोपरखैरणे विभाग – दि. 23 ऑक्टोबर 2018
वाशी विभाग – दि. 24 ऑक्टोबर 2018
नेरुळ विभाग – दि. 30 ऑक्टोबर 2018
दिघा विभाग – दि. 31 ऑक्टोबर 2018
या पाहणी दौ-यांमध्ये सकाळी 10 ते 11 या वेळेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. हे विभागातील नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, सूचना जाणून घेणार आहेत. याकरीता नागरिकांना सकाळी 9.30 ते 10 या वेळेत टोकन क्रमांक दिले जाणार असून नागरिकांनी लेखी स्वरुपात आपल्या संकल्पना / सूचना / तक्रारी दोन प्रतीत महापालिका आयुक्तांकडे सादर करावयाच्या आहेत.
त्यानंतर महापालिका आयुक्त हे विभाग प्रमुख व संबंधित अधिका-यांशी चर्चात्मक बैठक घेऊन विभाग कार्यालय परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार आहेत.
तरी महापालिका आयुक्तांच्या पाहणी दौ-याच्या ऐरोली विभागातील नियोजित 5 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर या बदललेल्या तारखेची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच महानगरपालिकेशी संबंधित आपल्या विभागातील संकल्पना / सूचना / तक्रारी असल्यास आयुक्त भेटीच्या तारखेस उपस्थित राहून त्या लेखी स्वरुपात दोन प्रतीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेकडे सादर कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.