पनवेल : सिडको हद्दीतील प्रत्येक भागात पुरेसा व नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी उपाययोजना करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा केंद्रांना भेट देऊन या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. नागरिकांच्या राहणीमानात सर्वांगीण सुधारणा झाली पाहिजे, या अनुषंगाने सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने नागरिक आणि सिडकोच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली लावण्यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या वेश्वी, हेदुटणे, हमरापूर आदी ठिकाणच्या पाणी वितरित केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. या पाहणीसाठी सह व्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, मुख्य अभियंता श्री. धायटकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व नियमित होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता, पाईपलाईन तसेच आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम करण्यासोबत तात्काळ उपाययोजना व दीर्घकालीन उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चौकट- आमदार प्रशांत ठाकूर जमिनीवर राहून आणि तळागाळात जाऊन काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत, प्रत्यक्ष कार्यवाहीवर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते ऊन-ताण, पाऊस-वारा याची तमा न बाळगता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन त्याच्यावर उपाययोजना करतात. त्यामुळे आजचा हा दौरा खऱ्या अर्थाने पाणी नियोजनासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.