नवी मुंबई महानगरपालिकेच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडणूका संपन्न झाल्या. महापालिका विषय समिती सदस्य आणि सभापती निवडणूका या दरवर्षी होतच असतात, परंतु यावर्षीच्या निवडणूका आमच्यासाठी आगळ्यावेगळ्या आणि संस्मरणीय आहेत. आमच्या प्रभागाच्या नगरसेविका असलेल्या आणि आमच्या ताईसाहेब असलेल्या सौ. सुजाताताई सुरज पाटील यांची नवी मुंबईचे शिल्पकार असलेले लोकनेते गणेश नाईक आणि नवी मुंबईचे विकासपर्व असणारे संदीप नाईक यांच्या आशिर्वादाने महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली. अर्थात उशिरा का होईना, आमच्या ताईसाहेबांना आणि ताईसाहेबांच्या कर्तृत्वाला न्याय मिळाला.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड ही एक योग्य निवड म्हटलीच पाहिजे. ताईसाहेब या वाणिज्य शाखेच्या द्विपदवीधर आहेत. राजकारणापेक्षा समाजसेवेत असणार्या ताईसाहेबांचे त्यांच्या कुटूंबावर विशेष प्रेम आहे. ‘घार फिरते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ ही उक्ती आमच्या ताईसाहेबांना अगदी शोभून दिसते. एकत्र कुटूंब पध्दतीत वावरणार्या व सासरच्या मंडळींवर बेफाम प्रेम करणार्या आमच्या ताईसाहेब म्हणजे अगदी कलियुगात मराठीतील चरित्र अभिनेत्री अलका कुबलचीच भूमिका बजावत असाव्यात. ताईसाहेब महापालिका मुख्यालयात महासभेला असो अथवा प्रभाग समितीच्या बैठकीत असो अन्यथा सारसोळे-नेरूळ सेक्टर सहा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात ताईसाहेब असो, सातत्याने ताईसाहेबांचा भ्रमणध्वनी घरच्यांची ख्यालीखुशाली घेतच असतो. स्वत:ची मुलगी, मुलगा व पुतण्या यांच्या अभ्यासाविषयी ताईसाहेबांचे विशेष लक्ष असते. सासू-सासरे, दिर-जावूबाई याच विश्वात स्वर्गसुख मानणार्या आणि पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यत संसारात रममाण होणार्या आमच्या ताईसाहेब अपघाताने राजकारणात आल्या. यजमान सुरज पाटील हे राजकारणात सक्रिय असले तरी कुंटूंबाची चौकट हेचि माझे पंढरपुर हे आमच्या ताईसाहेबांच्या जीवनप्रणालीचे सूत्र होते. समाजसेवेची आवड असल्याने घराशेजारी असलेल्या यजमानाच्या जनसंपर्क कार्यालयात बसून महिलांच्या समस्या सोडविणे ही कामे मात्र ताईसाहेब नित्यनियमाने करत असायच्या. कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर दहामधील महिलांशी ताईसाहेबांचा जनसंपर्क वाढत गेला. राजकारणात सुरज पाटलांचा महापालिका प्रभाग महिला आरक्षित झाला आणि अनायसे पक्षाची राजकीय गरज आणि सर्वसामान्यांची मागणी यामुळे ताईसाहेबांचा राजकारणात प्रवेश झाला.
ताईसाहेबांचा शांत व संयमी स्वभाव, अंगी विनम्रता व गुणवत्ता असूनही आचरणात शालिनता, सर्वांशी आपुलकीने बोलताना लहान-मोठ्यांचा आदर करणे यामुळे ताईसाहेबांकडून कधीही कोणीही दुखावला जाणे शक्यच नाही. राजकारणात ताईसाहेबांच्या सक्रिय प्रवेशाला तीन वर्षे पाच महिन्याचा कालावधी लोटला तरी ताईसाहेबांचे पाय आजही जमिनीवरच आहे. ताईसाहेबांच्या आचरणात आणि वर्तनात एकवाक्यता आहे.
ताईसाहेब शांत व संयमी असल्याचा त्यांना त्यांच्या आजवरच्या वाटचालीत खूपच फायदा झाला आहे. कानात आणि डोळ्यात काही अंतर असल्याने ताईसाहेब आजही हलक्या कानाच्या बनल्या नाहीत याचा आम्हा सर्वांना निश्चितच अभिमान वाटतो. मोठ्या वृक्षाखाली वेलीची अथवा लहान वृक्षांची वाढ होत नाही असे म्हटले जाते. पण आमच्या ताईसाहेब त्याला अपवाद ठरल्या आहेत. सुरज पाटलांचे त्यांना मार्गदर्शन लाभत असले तरी ताईंनी अल्पावधीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ताईसाहेबांनी स्वत:चे स्वतंत्र जाळे निर्माण केले आहे. कुकशेतची घटना घडल्यावर आणि काही राजकीय मातब्बर शक्तींनी त्यात जाणिवपूर्वक सुरज पाटील यांना गोवल्यावर त्या काळात ताईसाहेबांनी दाखविलेल्या धिरोदत्तपणाला एकदा नव्हे तर शतदा मानाचा मुजरा करण्यासाठी नेहमीच आमचे हात शिवशिवत असतात.
प्रभागातील जनतेने २०१५ सालच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग ८५ मधील कुकशेत व सारसोळे गावच्या ग्रामस्थांनी तसेच नेरूळ सेक्टर सहाच्या जनतेने दाखविलेल्या विश्वासाची पोचपावती देण्याचा ताईसाहेबांनी संकल्प केला आहे आणि तो संकल्प तडीस नेण्यासाठी ताईसाहेब प्रयत्न करत असतात. प्रभागाची धुरा हाती घेतल्यावर सर्वप्रथम ताईसाहेबांनी पालिका अधिकार्यांसमवेत प्रभागाचा दौरा केला. प्रभागातील कानाकोपर्यात पायपीट केली. या सर्व दौर्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. कारण पाच वर्षापूर्वी तुम्ही मला सोपविलेला प्रभाग आणि आज मी तुम्हाला पाच वर्षानंतर दाखविलेला प्रभाग हे ताईसाहेबांना जनतेला उक्तीतून नाही तर कृतीतून दाखवून द्यायचे आहे. परिसराची पायपीट करताना मच्छि मार्केटजवळील बकालपणा व शेवाळलेल्या परिसरात ताईसाहेब पडल्या, ताईसाहेबांना लागलेही, पण हे कोणालाही न सांगता ताईसाहेब काही मिनिटाकरिता घरी गेल्या, परंतु दौरा चालूच ठेवा, थांबवू नका, अशा सूचना ताईसाहेबांनी सहभागी कार्यकर्त्यांना व पालिका अधिकार्यांना दिल्या. मच्छि मार्केटजवळ ताईसाहेब पडल्यावर काळजाचा ठोका चुकला होता, कारण ताईसाहेबांना लागले होते, परंतु पाण्यातील माशाला आपले अश्रू कोणाला दाखविता येत नाही. हाच पाहणी दौरा भाजी मार्केट मैदानाजवळ आला असता पुन्हा पाचच मिनिटात ताईसाहेब कपडे बदली करून पाहणी अभियानात सहभागी झाल्या होत्या. जनसेवेचा वसा हाती घेतला असताना आपल्या दु:खाचे भांडवल करणे शक्य नाही, इतकेच त्यावेळी ताईसाहेब वदल्या होत्या.
आज साडेतीन वर्षाच्या काळात परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आणि परिसरात सुविधांचा डोंगर उभा करण्यासाठी ताईसाहेब प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. प्रभाग समितीच्या बैठकीत, महासभेदरम्यान परिसरातील समस्यांना ताईसाहेब वाचा फोडत आहेत. वेळ पडल्यास महासभेत परिसरातील समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यास जमिनीवरही बसण्यास ताईसाहेब मागेपुढे पाहत नाहीत.
ताईसाहेब आता नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती बनल्या आहेत. ताईसाहेब त्या पदाला नक्कीच त्या न्याय देतील याची आम्हाला खात्री आहे. नवी मुंबई शहराच्या महिलांसाठी व बालकांसाठी ताईसाहेब काहीतरी भरीव करून दाखवतील याचा विश्वास आहे. आमच्या ताईसाहेब आमचा श्वास आहेत. ताईसाहेब, सभापतीपदी निवड झाल्याबाबत तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांना न्याय द्या. ताईसाहेब आम्ही तुमची सावली आहोत. तुमच्या चांगल्या काळात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर कदाचित वाईट प्रसंग आल्यास आम्ही तुमच्या पुढे असू याची खात्री बाळगा, जनतेच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता झाल्यास तुमच्यापेक्षाही आम्हाला खूप आनंद होईल. ताईसाहेब तुमच्याविषयी सांगण्यासारखे व लिहिण्यासारखे खूप आहे. तुर्तास येथेच थांबतो.