रखडलेले सुशोभिकरणाचे काम मार्गी लागणार * बुधवारी या संदर्भात बैठक
पनवेल : खांदेश्वर तलाव परिसरात असलेल्या असुविधांच्या पार्श्वभूमीवर सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचबरोबर संजय भोपी सोशल क्लब, अलर्ट सिटीझन फोरम आणि माँर्निग योगा गृपच्या सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतले. येत्या बुधवारी या संदर्भात बैठक लावण्यात येणार असल्याची ग्वाही सिडको अध्यक्षांनी दिली. त्यामुळे रखडलेल्या सुशोभिकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
खांदेश्वर मंदीर आणि तलाव परिसरात रहिवाशी मोठया संख्येने येतात. त्याचबरोबर बाजूला उदयान असल्याने सायंकाळी आणि सुट्टीच्या दिवशी मोठया प्रमाणात गर्दी असते. त्याचबरोबर सकाळी माँर्निंग वाँककरीता सुध्दा अनेकजण येथे येतात. एकंदरीतच खांदा वसाहतीच्यादृष्टीकोनातून खांदेश्वर मंदीर आणि तलाव परिसर अतिशय महत्वाचा मानला जातो. परंतु गेल्या दहा वर्षापासून सिडकोने येथे पाहिजे त्याप्रमाणेत ध्यान दिले नाही. खांदेश्वर तलावात गणपती विसर्जन केले जात असल्याने या ठिकाणी मासांचा मृत्यू होत आहे. त्याचबरोबर आतमध्ये मोठया प्रमाणात कचरा टाकला जातो. त्यामुळे हा जलसाठा दुषीत झालेला आहे याबाबत उपाययोजना झाल्या नाही.
जाँगिंग ट्रॅकची अवस्था फार चांगली नाही. तसेच येथे व्यायामाकरीता ओपन जीमचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. ते सुध्दा दुर्लक्षीत करण्यात आला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त उदयानातही सुविधांचा वाणवा आहे. नगरसेवक संजय भोपी यांच्या मागणीनुसार सिडको अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी दुपारी तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी वेळी प्रभाग समितीचे सभापती एकनाथ गायकवाड, नगरसेविका सिताताई पाटील, संजय भोपी, कुसुम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, मोतीराम कोळी, संजय पाटील, गोपिनाथ मुंडे, सचिन गायकवाड, मच्छिंद्र वर्तक, नवनाथ मेंगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भोपी आणि इतर संस्थांनी सिडको अध्यक्षांना विसर्जनाकरीता कृत्रीम तलाव, ओपन जीन, अभ्यासिका, जाँगिग ट्रॅक संदर्भात निवेदन सादर केले. या बाबत बुधवारी बैठक घेवून या समस्यांबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच प्रलंबीत मागण्या सिडको त्वरीत मार्गी लावेल असे आ. प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
चौकट
मंगळवारी सिडको अधिकारी पाहणी करणार
बुधवारी होणाऱ्या बैठकीच्या आगोदर खांदेश्वर तलाव, उदयानाची सिडकोचे अधिकारी पाहणी करतील. त्यानंतर ठोस उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही यावेळी सिडको अध्यक्षांकड़ून सांगण्यात आले. महापालिका स्थापन होण्याच्या आगोदर या परिसराचे सुशोभिकरणाचा प्रस्ताव होता मात्र नंतर रेंगाळला असल्याचेही यावेळी संजय भोपी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.