पनवेल : देशभर भाजपाच्या विरोधात वातावरण आहे. पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या आदेशानुसार पनवेल विधानसभा मतदार संघात भाजपाच्या भ्रष्टाचाराविषयी रान उठवण्याचे संदेश स्वतः गांधी यांच्यामार्फत प्रमुख कार्यकर्त्यांसह पक्षाच्या पारंपरिक मतदारांनाही येत आहेत, असे असताना भाजपासोबत सलगी साधून ग्रामपंचायत निवडणूकीत कॉंग्रेसला भाजपाच्या दावणीला बांधल्याप्रकरणी पक्षाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याची तक्रार वजा माहिती प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना काही निष्ठावंत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली. त्यावर स्थानिक पातळीवर घेतलेल्या निर्णयाबद्दल आपल्याला काहीच कळविले नसल्याचे सांगून याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. तसेच त्यासंदर्भात पुराव्यानिशी लेखी माहिती देण्याचे त्यांनी शिष्टमंडळाला सुचवून भाजप हा कॉंग्रेसचे मुख्य शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आघाडीबाबत कुणाशीही चर्चा झालेली नाही, असेही ते म्हणाले.
काल, शुक्रवारी (दि. 12) महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, भिमसेन माळी, कांतीलाल कडू, असफाक खमसे, शशिकांत बांदोडकर, ऍड. अरविंद चामले, रिजवान पटेल, जाहिद पटेल, चंद्रकांत शिर्के, वैभव जोशी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी मुंबईतील गांधी भवन येथे भेट घेऊन चर्चा केली.
पनवेल विधानसभा क्षेत्र आणि पनवेल महापालिका परिसरात कॉंग्रेसचे पारंपरिक मतदार काही अपरिहार्य कारणास्तव पक्षापासून अलिप्त राहू लागल्याची खंत व्यक्त करत पक्षाला मजबूत करण्याची अनेकांची इच्छा असल्याने खा. चव्हाण यांनी पनवेलकडे अधिक लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली. याशिवाय शेकाप आणि भाजपासोबत ग्रामपंचायतीला आघाडी करून पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांच्या हेतूलाच काळिमा फासला जात असल्याचे संकेत मतदारांपर्यंत पोहचविण्याची खेळी काहींनी केल्याने देशभर राहूल गांधींचे कौतुक होत असताना इथे भाजपासोबतच्या आघाडीमुळे पक्षाला बॅकफुटवर जावे लागत असल्याने आताच पक्षाला सावरण्याची गरज वर्तविली.
पदाचा गैरवापर करून पदे वाटप केली जात असल्याने मोठ्या प्रमाणावर पक्षात नाराजी व्यक्त होत असल्याचे सांगताच, याची तात्काळ शहनिशा करण्याचे निर्देश खा. चव्हाण यांनी कार्यालयीन चिटणीस साठे यांना दिले. त्याशिवाय लवकरच पनवेल महापालिका जिल्हा उदयास येईल आणि जिल्हाध्यक्ष तसेच नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जवळपास पाऊणतास चव्हाण यांच्यासोबत पनवेल कॉंग्रेसच्या जडणघडणीबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. त्यांनी अतिशय सकारात्मक आणि पक्षाच्या वाढीस दूगदृष्टीने निर्णय घेतला जाईल. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम प्रांताध्यक्ष म्हणून करण्यासाठी शक्य नसेल तरीही प्रत्येकाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्नही करेन आणि पनवेल कॉंग्रेसला मजबूत करेन, असे सांगतानाच आतापर्यत कुठेच आघाडीबाबत निर्णय झाला नसल्याने कुठल्याही पक्षासोबत आघाडी झाल्याच्या अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी खा. चव्हाण यांनी शिष्टमंडळाला विश्वासात घेऊन पक्षाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केल्याबद्दल भिमसेन माळी व डॉ. दवे यांनी खास शैलीत त्यांचे ऋृण व्यक्त केले. चर्चेच्या प्रसंगी, पक्षाच्या लोकसभा निवडणूक समितीचे सदस्य, माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.