नवी मुंबई : प्रभागातील कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक कला केंद्रात अभ्यासासाठी जागेअभावी होत असलेली गैरसोय दूर करण्याची लेखी मागणी प्रभाग ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नेरूळ प्रभाग ८७ मधील सेक्टर ८ परिसरात कै. ज्ञानेश्वर शेलार सांस्कृतिक कला केंद्रात परिसरातील तसेच नेरूळ नोडमधील अन्य विभागातील स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी तसेच दहावी आणि बारावीचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहे. कला केंद्रात असलेल्या अभ्यासिकेत वाढती विद्यार्थी संख्या आणि कमी पडत असलेली जागा यामुळे स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यास करावयास मुलांना जागा कमी पडत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागेची असुविधा यामुळे अभ्यासातही अडथळा येवू लागला आहे. बाहेरून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या यामुळे अनेकदा स्थानिक परिसरातील मुलांनाही अभ्यासासाठी या ठिकाणी प्रवेश मिळत नाही. त्यामुळे आपण स्वत: येवून विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय ही समस्या जाणून घ्यावी , असे कळकळीचे आवाहन नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनास केले आहे.
स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सांभाळणारे भावी अधिकारी आपल्या नवी मुंबई कार्यक्षेत्रातील अधिकाधिक असावे यासाठी महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांची गैरसोय युध्दपातळीवर दूर होणे आवश्यक आहे. आपण स्वत: येवून पाहणी केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. आपण या ठिकाणी असलेल्या सभोवतालच्या अतिरिक्त रिकाम्या जागेत अतिरिक्त बांधकाम करून अभ्यासिका उपलब्ध करावी अथवा सांस्कृतिक कला केंद्र पाडून त्या जागेत टोलेजंग अभ्यासिका निर्माण करावी. पर्याय आपणास सुचविले आहेत, लवकरात लवकर समस्येवर तोडगा निघणे आवश्यक आहे. आपण स्वत: भेट द्यावी व या पाहणी अभियानात आम्हालाही सहभागी करून घ्यावे की जेणेकरून आपणास समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास आम्हाला आणून देता येईल असे नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.