2019 मध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होणार असून, ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या हाती राहणार नाही. 2019 मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असं वाटत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी आपण कधीही नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही असं म्हटलं आहे. आज तकच्या मुंबई मंथन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
शरद पवार बोलले आहेत की, ‘2004 मध्ये ज्या प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं, तीच परिस्थिती 2019 मध्ये असणार आहे. निवडणुकीनंतर सर्व पक्ष मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते पंतप्रधान झाले. 2004 मध्ये जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती 2019 मध्ये कायम राहणार आहे’.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारवर बोलताना त्यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व भाजपा नेता अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे नाही आहे. देशात बदल होत असून, आगामी निवडणुकीत देशातील जनतेला बदल पहायचा आहे. देशात महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता आहे.
सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज असून, महाराष्ट्रातही महायुती झाली पाहिजे असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशात जिंकण्यासाठी सपा आणि बसपाची साथ मिळणं गरजेचं असून भारतीय जनता पक्षानेही नेहमीच कोणाची तरी साथ घेतली आहे असं शरद पवार बोलले आहेत.
कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही असं सांगताना राजकारणात युतीनेच देश चालतो असं शरद पवार बोलले आहेत. सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी बहुमत ज्यांना जास्त असेल त्यांना संधी देण्यात येईल असं स्पष्ट केलं. तुम्ही पंतप्रधान होण्यास इच्छुक आहात का असं विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला.
राजकारणात पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, तेव्हाच 50 वर्ष राजकारण करता येईल असं उत्तर देताना मला अपघाती राजकारणात सहभागी होण्याची इच्छा नाही असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला दुर्लक्षित करु शकत नाही असंही सांगितलं.
राफेल विमानावरुन मोदींचं कौतुक केल्याच्या प्रश्नावर बोलताना मीडियामध्ये जागा भरण्यासाठी वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं त्यांनी म्हटलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, राफेल चांगलं विमान आहे, आम्ही या विमानाची पाहणी केली होती. राफेल एक चांगलं विमान आहे या विधानावर मी आजही ठाम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
राफेलच्या किंमतीवरुन लोकांच्या मनात संशय आहे. हा संवेदनशील विषय असल्याने या विषयावर जास्त बोलू शकत नाही. मात्र किंमतीत इतका फरक पडू शकत नाही असं शरद पवार बोलले आहेत. राहुल गांधी राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत असल्याच्या प्रश्नावर बोलताना राहुल गांधींचे माझ्यापेक्षा जास्त चांगले संपर्क असावेत असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.