नवी मुंबई : नेरूळ नोडमधील प्रभाग ८५, ८६ कार्यक्षेत्रातील सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत गावात गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी व इतर बाराही महिने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डीग लागत असतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्यावर कारवाई होत नाही आणि होर्डीग लावणार्यांवर फौजदारी गुन्हेही दाखल केले जात नाही. यामुळे परिसराला बकालपणा येत असून महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. त्यामुळे नेरूळ पालिका विभाग कार्यालयातील अतिक्रमण विभागाच्या अधिकार्यांचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी नेरूळ विभाग अधिकार्यांना दिलेल्या लेखी निवेदनातून उपहासात्मक स्वरूपाचे अभिनंदन केले आहे.
नेरूळ नोडमध्ये प्रभाग ८५ व ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव आणि कुकशेत गाव या ठिकाणी सातत्याने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत होर्डिग लागत असतात. या होर्डिगवर कोठेही आपणास पालिका परवानगीचे स्टीकर पहावयास मिळत नाही. या अनधिकृत होर्डीगमुळे पालिका प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव, नवरात्रौत्सवमध्ये ठिकठिकाणी राजकीय घटकांचे अनधिकृत होर्डीग लागलेले पहावयास मिळाले. अर्ंतगत रस्ते, बाह्य रस्ते तसेच सार्वजनिक क्रिडांगण, उद्यान व अन्य ठिकाणी तसेच रस्त्यारस्त्यावरील पथदीपावरही अनधिकृत होर्डीग मोठ्या संख्येने लागलेले होते. कार्यक्रम व वाढदिवस हे होर्डीग सातत्याने लागलेले असतात. विशेष म्हणजे कार्यक्रम संपल्यावरही होर्डीग काढले जात नाही. अनधिकृत होर्डीगमुळे पालिकेचा महसूल बुडतो व परिसराला बकालपणा येत आहे. अनधिकृत होर्डीग लावणार्यांच्या विरोधात पालिका प्रशासनाने आजतागायत कारवाई केलेली नाही अथवा हे अनधिकृत होर्डीग लावणार्यांविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आलेला नसल्याचे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नेरूळ सेक्टर सहा, सारसोळे गाव व कुकशेत गावातील अर्ंतगत व बाह्य रस्ते तसेच सार्वजनिक उद्यान व क्रिडांगण, पथदिपावरील अनधिकृत होर्डीगविरोधात कारवाई न करता परिसराच्या बकालपणाला खतपाणी घालणार्या पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यासाठी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी पालिकेच्या नेरूळ विभाग अधिकार्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.