नवी मुंबई : पावणे एमआयडीसीमधील ४२ एकर जागा हडप करुन तिथे उभारलेले अनधिकृत बावखळेश्वर मंदिर पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मंदिर पाडण्याचा निर्णय गणेश नाईक पालकमंत्री असताना न्यायालयाने २०१३ मध्ये घेतलेला आहे. या खटल्याशी आमचा काही एक संबंध नसताना शहरातील काही घटकांनी शिवसेनेच्या नावाने गरळ ओकण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या विरोधात आंदोलन करुन त्यांची प्रतिमा पायदळी तुडविण्याचा प्रकार घडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे शहरात तनाव निर्माण झाला असल्याने या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज वाशी पोलीस ठाण्यावर धडक देण्यात आली.
मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभाती, शिवसेना उपनेते विजय नाहटा (राज्यमंत्री दर्जा) यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो शिवसैनिकांनी वाशी पोलीस ठाण्यावर धडक देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांना घेराव घातला. माजी मंत्री गणेश नाईक यांच्या कृपाशिर्वादाने पावणे एमआयडीसीत अनधिकृत रित्या उभा राहिलेले बावखळेश्वर मंदिर पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मंदिर वाचविण्याचे सर्वच प्रयत्न फसल्यामुळे सैरभैर झालेल्या राष्ट्रवादीने काही प्यादे पुढे करुन काहीच कारण नसताना शिवसेनेला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत मंदिर बचाव समितीने वाशी येथील शिवाजी महाराज चौकात शनिवारी जी निदर्शने केली, त्यामध्ये आंदोलनाच्या आचारसंहितेचा भंग झाला आहे. या आंदोलकांनी सुभाष देसाई यांच्या विरोधात शिवराळ भाषेत घोषणाबाजी करुन त्यांची प्रतिमा पायदळी तुडवली. त्यामुळे सणासुदीच्या काळात शहरात विनाकारण तणाव निर्माण आहे, असे शिवसेनेच्या वतीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आणि या आंदोलनकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव, संतोष घोसाळकर, दिलीप घोडेकर, अतुल कुलकर्णी, शहरप्रमुख विजय माने, प्रविण म्हात्रे, शहरसंघटक रोहिणी भोईर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, रंगनाथ औटी, ज्ञानेश्वर सुतार आदी सहभागी झाले होते.
* देवालाच तिथे राहण्याची इच्छा नाही
बावखळेश्वर मंदिर कसे उभा राहिले हे सर्व नवी मुंबईकरांना माहिती आहे. ते श्रध्देपोटी बांधण्यात आलेले नसून ४२ एकर जागा हडपण्यासाठी तयार करण्यात आले आहे. दारुतून मिळालेला सर्व पैसा या मंदिरावर खर्च झाला आहे. त्यामुळे तिथे देवालाही राहण्याची इच्छा नसावी म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विजय नाहटा यांनी यावेळी व्यक्त करुन ही जागा २५ वर्षे वापरल्या प्रकरणी संबंधितांकडून ५० कोटींची नुकसान भारपाई वसुल करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले.
* निदर्शनला परवानगी नव्हती
बावखळेश्वर वाचविण्यासाठी राष्ट्रवादी पुरस्कृत मंदिर बचाव समितीने शनिवारी सकाळी वाशी येथील शिवाजी चौकात जे आंदोलन केले, त्याला पोलिसांची परवानगी घेतलेली नव्हती. बिनापरवानी झालेल्या आंदोलनात आंदोलनकांनी अक्षपाहार्य घोषणाबाजी केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा वाशी पोलिसांनी दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
* निलेश तांडेल विरोधात तक्रार करणार
राष्ट्रवादीची पुरस्कृत मंदिर बचाव समितीमध्ये सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल यांनी मोठा पुढाकार घेऊन राज्य सरकारमधील एक जबाबदार मंत्री म्हणून ओळख असलेले सुभाष देसाई यांच्यावर चिखलेपेâक केली आणि शहरात विनाकारण तणाव निर्माण केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही विजय नाहटा यांनी यावेळी स्पष्ट केले.