सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ हटविण्याची मागणी भाजपचे वॉर्ड ८४चे अध्यक्ष विलास चव्हाण यांनी महापालिकेच्या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
उद्यानात सुकलेला पालापाचोळ्याचा ढिगारा सफाई कामगारांकडून उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरच ठेवण्यात आला आहे. यामुळे परिसराला व उद्यानाला बकालपणा प्राप्त झाला असून हा कचरा वेळोवेळी पालिका प्रशासनाने उचलून नेल्यास त्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचणार नाहीत. स्वच्छ व सुंदर नवी मुंबईच्या संकल्पनेला महापालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे गालबोट लागत असून नागरिकांना उद्यानात ये-जा करताना त्रास होत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता हा कचरा शक्य तितक्या लवकर हटविण्याची मागणी भाजपच्या विलास चव्हाण यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.