नवी मुंबई : गावठाण विस्तार व विस्तारीत गावठाण सर्व्हे याबाबत नवी मुंबई पट्टीतील ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण असतानाच बेलापुर पट्टीतील सारसोळे गावचे ग्रामस्थ याबाबत एकत्रित झाले असून सर्व्हे करावयाचा झाल्यास मूळ गावठाण व विस्तारीत गावठाणाचा एकत्रित सर्व्हे करण्याची मागणी सारसोळेच्या ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत सारसोळेच्या ग्रामस्थांची सारसोळे गावातील महापालिका शाळा क्रं १२ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेमध्ये नुकतीच बैठक झाली असून या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, गावठाण विस्तार समिती करावे गाव अध्यक्ष संग्राम पाटील, घणसोली गावचे अध्यक्ष दिपक पाटील, सानपाड्यातून प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत सारसोळे गावचे ७० ग्रामस्थ सहभागी झाले होते.
राज्य सरकारने काढलेल्या २००९च्या अधीसूचनेनुसार शासनाकडून मनपा व अधिकार मूळ गावठाण व विस्तार गावठाण सर्व्हे होणे आवश्यक होते. परंतु राज्य सरकारच्या अधिसूचनेला सिडको व महापालिका दोन्ही सरकारी प्राधिकरणांने टोलवाटोलवीच केली. सरकारी नियमाप्रमाणे दर दहा वर्षानी गावठाण विस्तार हद्द निश्चित होणे आवश्यक होण्याकरिता सिडकोकडून सर्व्हे होणे आवश्यक होते. परंतु सिडकोने एकदाही विस्तारीत गावठाण हद्द निश्चित करण्याकरिता सर्व्हे न करता नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या, मुळ भूमीपुत्रांच्या जखमेवर मीठच आजवर चोळले असल्याचा संताप या बैठकीत सारसोळेच्या ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला.
लोकसभा निवडणूकीपूर्वी मूळ गावठाण व विस्तारीत गावठाण याचा एकत्रित सर्व्हे होवून सारसोळेच्या ग्रामस्थांना दिलासा न दिल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा तसेच येत्या लोकसभा निवडणूकीत मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा या बैठकीत सारसोळेच्या ग्रामस्थांकडून देण्यात आला.