पनवेल : पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येऊन दोन वर्षे उलटून गेली आहेत. तरी देखील या महापालिका कार्यालयात पत्रकार कक्ष उभारण्यात आलेला नाही त्यामुळे या पत्रकार कक्षासाठी पनवेल येथील पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे साखळी उपोषण १२ नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. या उपोषणाला पनवेल व परिसरातील विविध संस्था व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
पनवेल येथील महापालिका कार्यालयात अद्यापही पत्रकारांसाठी स्वतंत्र असा पत्रकार कक्ष बांधण्यात आलेला नाही. पत्रकार कक्ष मिळावा यासाठी पनवेल पत्रकार मित्र असोसिएशान तर्फे पालिका आयुक्त गणेश देशमुख, महापौर कविता चौतमोल, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, याना निवेदन देण्यात आलेले आहे. महानगरपालिकेमध्ये अनेक पत्रकार वार्तांकन करण्यासाठी येत असतात. यामध्ये बरेचशे पत्रकार नवी मुंबई येथील सुद्धा असतात. मात्र पालिकेत आल्यानंतर आयुक्त, महापौर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक यांच्या भेटी घेण्यासाठी त्यांना ताटकळत राहावे लागते. तसेच यामध्ये पत्रकारांचा वेळ वाया जात असल्यामुळे पालिकेच्या इमारतीमध्ये पत्रकार कक्ष असणे ही काळाची गरज आहे. पत्रकार कक्षाबाबतची मागणी याआधी अनेकदा पनवेलच्या पत्रकारांकडून करण्यात आली होती. मात्र पालिका प्रशासनाने महानगरपालिका होऊन २४ महिने उलटले तरी अद्यापही पत्रकार कक्ष उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने १२ नोव्हेंबर रोजी सकाळी पालिका कार्यालयाच्या बाजूलाच साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. पत्रकार कक्ष उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर या कक्षामध्ये सीसीटीव्ही लावण्यात यावे व पालिकेतील पत्रकारांना बसण्यासाठी आणि बातम्या लिहिण्यासाठी योग्य प्रमाणात खुर्च्या, टेबल, संगणक आदींची सुविधा करून देण्याची तसेच महिला पत्रकारांना आवश्यक असलेल्या सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी पत्रकार मित्र या संघटनेने प्रशासनाकडे पत्राद्वारे वेळोवेळी केली आहे. मात्र प्रशासनाने केवळ वेळ मारून नेली असल्याचा आरोप अध्यक्ष केवल महाडिक यांनी केला आहे. या साखळी उपोषणाला पनवेल मधील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, जनशक्ती पक्ष, आरपीआय डेमोक्रेटीक, मनसे, आदिवासी सेवा संघ, मानवाधिकार संघ, नगरसेवक, नवी मुंबई युवा संस्था, कामोठे एकता सामाजिक संस्था, अस्मिता सामाजिक संस्था, जय भवानी सामाजिक संस्था, युथ राईट कौन्सिल, रिक्षा असोसिएशन संस्था, क्रांतिकारी सेवा संघ, आदिवासी विकास परिषद, नैना प्रकल्प संघर्ष समिती, पत्रकार संघर्ष समिती, पनवेल पत्रकार उत्कर्ष समिती, शिवप्रेमी विद्यार्थी वाहक सामाजिक संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे.