अहमदनगर / प्रतिनिधी
अहमदनगर महापालिका निवडणुकीत इतर पक्ष उमेदवारांसाठी चाचपडत असताना भाजपकडून मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. सोमवारी नगरच्या लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. यावेळी इच्छुक उमेदवारांनी अक्षरश: ढोल ताशांच्या गजरात मुलाखतींना हजेरी लावली. भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी अधिक असल्याने दिवसभरात फक्त तीस ते चाळीस टक्के मुलाखती पुर्ण होऊ शकल्या आहेत. उर्वरित मुलाखती मंगळवारी घेतल्या जाणार असून लवकरच उमेदवारांची यादीही जाहीर केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर सर्वच पक्षांनी हालचालींना सुरूवात केली आहे. अहमदनगर महापालिकेची ही चौथी सार्वत्रिक निवडणुक असून स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार्या भाजपनेही उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. सोमवारी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात दिवसभर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह खासदार दिलीप गांधी, आमदार सुजितसिंग ठाकूर, प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, भाजप कार्यकारणी सदस्य अभय आगरकर आणि जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. नियोजनानुसार सोमवारचा फक्त एकच दिवस मुलाखतीसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा मिळालेला ‘प्रचंड’ प्रतिसाद पाहता मंगळवारी देखील मुलाखतींचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आ. सुजीतसिंग ठाकूर यांनी दिली. पहिल्या दिवशी १ ते १२ प्रभागांतील ११७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण झाल्या असून उर्वरित प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी होणार आहेत. प्रभाग क्रमांक ५ मधून सर्वाधिक १९ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या, तर प्रभाग क्रमांक ३ मध्येही इच्छुक उमेदवारांची संख्या ११ इतकी होती. भाजपच्या उमेदवारीसाठी झालेली गर्दी म्हणजे गेल्या चार साडेचार वर्षांच्या काळात भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासाच्या कारभाराला मिळालेली पावती असल्याची प्रतिक्रिया आ. सुजीतसिंग ठाकूर यांनी दिली. तर आजपर्यंत दुर्लक्षीत राहिलेली ही महापालिका अधिक सक्रिय करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील मतदारही भाजपच्या पारड्यात यावेळी नक्की आपले मत टाकतील, अशी प्रतिक्रिया खा. दिलीप गांधी यांनी व्यक्त केली.
९ डिसेंबर रोजी महापालिकेसाठी मतदान होणार असून १० डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ही निवडणुक होत असून १३ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ९ डिसेंबरला मतदान होणार असून १० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.