नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २५ येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक उद्यानात सुकत चाललेली पामची झाडे आणि वाढलेली जंगली झाडे, जंगली गवत या गोष्टी महापालिका प्रशासनाला भूषणावह नसून करदात्या नवी मुंबईकरांना प्रशासनाकडून सुविधा न देता असुविधा वाढविण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या उद्यानातील समस्या हटवून लवकरात लवकर सुशोभीकरण करण्याची लेखी मागणी भाजपचे प्रभाग ८४चे अध्यक्ष विलास चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
उद्यानाच्या सुशोभीकरणाकरीता पामची झाडे व लाल माती आणून ठेवली असली तरी लवकर काम न झाल्याने पामची झाडे सुकून गेली आहेत. उद्यानात जंगली गवत व जंगली वनस्पती वाढत असताना ती काढून टाकण्याकडे पालिका प्रशासनाकडून कामचुकारपणा होत आहे. उद्यानाचे सुशोभीकरण हे करदात्या नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे. उद्यानाचे काम सुरू करून थांबले आहे. करदात्या नागरिकांना सुविधा देणे पालिका प्रशासनाला बंधनकारक असल्याने जुईनगरवासियांना सुसज्ज उद्यान देण्याची मागणी भाजपच्या विलास चव्हाण यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.