मुंबई : आपल्या व्यंगचित्रातून भाजपावर निशाणा साधणा-या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपाने त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. ‘साहेबांचं कार्टून की कार्टून साहेब?’ असा प्रश्न भाजपाने व्यंगचित्रासोबत विचारला आहे. निवडणूका जवळ आल्या असताना राज केवळ व्यंगचित्र काढण्यात मग्न असल्याचे दाखवले आहे. ‘साहेब आपल्याला एकही निवडणूक जिंकता आली नाही’, असे मनसे कार्यकर्ते राज यांना म्हणत असल्याचे दाखवत भाजपाने मनसेच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. महाराष्ट्र भाजपाने ट्विटरवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे.
‘साहेब लोकसभा निवडणूक जवळ आली, साहेब विधानसभा निवडणूक जवळ आली…’ असे कार्यकर्ते राज यांना म्हणत असताना दूसरीकडे राज व्यंगचित्र काढत असतात, असा टोला भाजपाने लगावला आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपाने राज यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. राज कार्यकर्त्यांकडे पाहत देखील नाहीत, असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे.
भाजप सत्तेत आल्यानंतर राज्याची, देशाची काय परिस्थिती झाली यावर टिका करणा-या व्यंगचित्रांची मालिका राज यांनी दिवाळी दरम्यान सादर केली होती. राज्यातील दुष्काळ, मोदींची आश्वासनं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावरील कोट्यवधींचा खर्च, शेतक-यांची दुरावस्था यांसारख्या अनेक मुद्यांवरुन राज यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. मंगळवारी राज यांनी अवनी वाघिणीच्या शिकारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर लक्ष्य केले होते.