नवी मुंबई : शहर हे नेहमीच नवनव्या संकल्पनांचा स्विकार करून नवेपणाकडे वाटचाल करणारे शहर असून येथील नागरिकांचा चांगल्या गोष्टींना भरभरून पाठींबा राहिलेला आहे. त्यामुळे ‘मुलींचे शिक्षण व स्वच्छ सर्वेक्षण विषयी जागरूकता’ या संकल्पनेवर आधारित ‘मिनी मॅरेथॉन’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्याविषयी जागरूकता दाखवितानाच, स्वच्छता हा आरोग्य संवर्धनाचाच महत्वाचा भाग आहे हे लक्षात घेत, आपले शहर स्वच्छ व सुंदर असावे ही भावनाही नागरिक मनापासून जपत आहेत, यातूनच ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ मध्ये आपल्या नवी मुंबई शहराचे देशातील स्वच्छतेचे मानांकन आणखी उंचावेल असा विश्वास नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी व्यक्त केला.
‘स्मार्ट कन्सेप्ट्झ’ या संस्थेच्या वतीने ‘चला, धावूया जागरूकतेने – मुलींच्या शिक्षणासाठी व नवी मुंबईच्या स्वच्छतेसाठी’ या संकल्पनेवर आधारित ‘नवी मुंबई लेट्स रन – सिझन 2’ या पाम बीच मार्गावर संपन्न झालेल्या मिनी मॅरेथॉन प्रसंगी महापौर श्री. जयवंत सुतार यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी सभागृहनेते श्री. रविंद्र इथापे, नगरसेविका श्रीम. रूपाली निशांत भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे, श्री. निशांत भगत, स्मार्ट कन्सेप्ट्झ संस्थेच्या प्रमुख श्रीम. मुग्धा कथुरिया उपस्थित होत्या.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त श्री. तुषार पवार यांनी यावेळी बोलताना स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या अनुषंगाने सर्व नागरिकांच्या सहयोगाने नवी मुंबई शहर सज्ज असल्याचे सांगत ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासोबतच नागरिकांनी आपला वापरात नसलेल्या इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचा ई कचराही वेगळा ठेवावा व पर्यावरणाला हानी न पोहचता त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेकडे स्वतंत्ररित्या द्यावा असे आवाहन केले. यावेळी महापौरांसमवेत उपस्थितांनी स्वच्छतेची व प्लास्टिकमुक्त नवी मुंबईची सामुहिक शपथ ग्रहण केली.
स्मार्ट कन्सेप्ट्झ संस्थेच्या वतीने आयोजित या रनमधून अधिकाधिक नागरिकांपर्यंत स्वच्छतेचा संदेश व्यापक स्वरूपात प्रसारित करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य होते. 21 किमी, 10 किमी व 5 किमी अशा 3 गटांत संपन्न झालेल्या या रनमध्ये 3 हजारहून अधिक विविध वयोगटातील नागरिक उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल महापौरांसह सर्वच मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करतानाच नवी मुंबईकर नागरिकांनीही रनमध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होत स्व आरोग्याप्रमाणेच स्वच्छता संकल्पेनेविषयीही सजगता दाखविली त्याबद्दल प्रशंसा केली.