मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल १ हजार कोटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अद्याप शिवस्मारकाचं कामदेखील सुरू झालेलं नाही. याचमुळे शिवस्मारकाच्या खर्चात १ हजार कोटींनी वाढ झाली आहे. शिवस्मारकाच्या उभारणीसाठी 2 हजार ६९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र आता डेडलाईन पुढे गेल्यानं हा खर्च ३ हजार ६४३ कोटींवर जाऊन पोहोचला आहे. शिवस्मारकाच्या कामाला विलंब होत असल्यानं खर्चात मोठी वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
२०१३ पासून शिवस्मारकाची चर्चा सुरू झाली. स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी ३६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. यानंतर शिवस्मारकाच्या निर्मितीसाठी अंदाजित खर्च २ हजार ६९२ कोटी रुपये इतका धरण्यात आला होता. मात्र अद्यापही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या काळात शिवस्मारकाच्या खर्चाच्या १ हजार कोटींची वाढ झाली आहे. हा खर्च आता ३ हजार ६४३ कोटी रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे स्मारकाच्या भूमिपूजनावरच आतापर्यंत ८ कोटींचा खर्च झाला आहे.