अक्षय काळे
सदृढ आरोग्य आणि एकतेचा संदेश
नवी मुंबई : सदृढ आरोग्य, बंधुभाव, एकतेचा आणि स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी येत्या २४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत महासायक्लोथॉन २०१९चे आयोजन करण्यात आले आहे.
अघामार्शना मेडीया आणि एन्टरटेनमेंट एलएलपी आणि मुंबई उपनगर जिल्हा हौशी सायकल संघटनेने या उपक्रमाचे आयोजन केले असून लोकनेते गणेश नाईक, यांच्यासह नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई वाहतूक पोलीस आणि महाराष्ट्र सायकल संघटना यांचे सहकार्य लाभले आहे.
लोकनेते गणेश नाईक यांनी या उपक्रमाविषयी माहिती देताना सर्वप्रथम पुलवामा हल्ल्यात शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. देशावरील प्रत्येक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि देशविघातक शक्तींचे आक्रमण परतवून लावण्यासाठी नागरिकांनी शारिरिक आणि मानसिकदृष्टया सक्षम असणे गरजेचे आहे. सायक्लोथॉन सारखा उपक्रम त्याच हेतूने आयोजित केला आहे.
ऐरोली येथील माईंड स्पेस कंपनीजवळून पुरुषांची मुख्य ४६ किलोमीटरची आणि महिलांची २६ किलोमीटरची मुख्य स्पर्धा सुरु होईल. वाशी येथील अरेंजा कॉर्नर येथून १५ किलोमिटरची महिला आणि पुरुषांची ड्रीम सिटी चॅलेंज स्पर्धा सुरु होणार आहे. तसेच याच ठिकाणाहून महिला-पुरुषांची ग्रांड आयकन राईड ही १० किलोमिटर अंतराची स्पर्धा देखील सुरु होणार आहे. या सर्व स्पर्धा पहाटे ५ वाजता सुरु होवून दुपारी १२ पर्यत त्यांची सांगता होणार आहे. मंगळवार १९ फेेब्रुवारी पासून वाशी येथील इनऑर्बीट मॉल येथे स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी सहभागी नागरिक त्यांचे ओळखपत्र संकलीत करु शकतील. विजेत्यांना एकूण सहा लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत अशी माहिती अघामार्शना मेडीया आणि एन्टरटेनमेंट एलएलपीचे सुभेंदू मैती यांनी दिली आहे. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी navimumbaimahacycothon.com या संकेतस्थळावर किंवा ७५०६०३२५१६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.